धनगर बांधवांनी स्वतः च्या रक्ताने लिहिलेले निवेदन; संकलित रक्त सैनिकांना  

देविदास वाणी
Thursday, 13 August 2020

कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्हातील घराघरांत समाजबांधवांकडून अभिवादन करण्यात आले.

 
जळगाव ः पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य माधवराव गोळवलकर रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात संकलित झालेले रक्त हे भारतीय सैनिक व कोरोनाबाधित रुग्णांसाठी दान करण्याचे धनगर ऐक्य समाजातर्फे सांगण्यात आले. 

धनगर समाज एस . टी . आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा, धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करुन, १००० कोटींची तरतूद ताबडतोब करा तसेच मेंढपाळांना संरक्षण देऊन त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवा. या मागणीसाठी धनगर समाज बांधवांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर बांधवांनी स्वतः च्या रक्ताने लिहिलेले निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले. यावेळी भरत येवस्कर, किरण साळुंखे, धनराज धनगर, चंद्रकांत श्रावणे, बंटी परदेशी, अंकुश सोनवणे आदी उपस्थित होते. धनगर समाजाच्या अनेक मागण्या या प्रलंबित आहेत. या वरील मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करून धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाची आंदोलने छेडणार असल्याचा इशारा श्री. येवस्कर यांनी दिला. 
 

मल्हारसेनेतर्फे अभिवादन 
जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हारसेना , कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्हातील घराघरांत समाजबांधवांकडून अभिवादन करण्यात आले. धनगर समाज बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ उखा बोरसे यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याच्या संदर्भातील आडिओ क्लिप गुरु थिअटर चे संचालक धनंजय धनगर व प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांच्या मार्फत आॅनलाईन ऐकविण्यात आली. प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे, सचिव प्रभाकर न्हाळदे, संचालक संतोष धनगर, मल्हारसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप तेले, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप धनगर , जिल्हा सरचिटणीस गणेश बागुल, मल्हारसेनेचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष डाॅ.संजय पाटील , जळगाव लोकसभेचे जिल्हासरचिटणिस महेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष प्रवीण पवार, मयुर ठाकरे, धिरज धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon statement written by Dhangar brothers with their own blood