गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; जिल्हाधिकारींच्या सुचना  

देविदास वाणी
Wednesday, 20 January 2021

आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करून त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलिस विभागाने दक्षता घ्यावी.

जळगाव ः ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जिल्ह्यात गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज दिल्या. 

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त य. कों. बेंडकुळे, विधी प्राधिकरणाचे सचिव ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामविकास) बी. ए. बोटे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले, की जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात. मुलींना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विशेषत: आदिवासी भागातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करून त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलिस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे. 

वेळोवेळी तपासणी

जिल्ह्यात नोंदणीकृत ३३४ सोनोग्राफी सेंटर असून, १५४ केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. 

जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर ९२० 

पीडित महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी १८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी ९१४, तर राज्याचा दर ८९४ इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर ९२० इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून, यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही श्री. परदेशी यांनी सांगितले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon strict action on gynecological diagnostic tests