जेलमध्ये चॉपर हल्ल्यातील संशयीताचा मृत्यू, मारहाणीत मेल्याचा नातेवाईकांचा आरोप 

सचिन जोशी
Friday, 11 September 2020

चिखलाने भरल्याचे दिसले. त्याच्या खांद्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने कारागृहातील पोलिसांनीच त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप चिन्याच्या पत्नीने केला. 

जळगाव  : चॉपर हल्ल्याच्या गुन्ह्यातील संशयिताचा न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी (११ सप्टेंबर) कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना दुपारी समोर आल्यानंतर न्यायालयीन कोठडीत झालेल्या मारहाणीत संशयिताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी; अन्यथा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातलगांनी घेतल्याने तणाव वाढला. 

शहरातील शिवाजीनगर- हुडकातील रहिवासी रवींद्र ऊर्फ चिन्या जगताप (वय ३७) याला चॉपर हल्ल्यात संशयित म्हणून पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने चिन्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याने तो तीन ते चार दिवसांपासून जिल्हा कारागृहात होता. 

दुपारी अत्यवस्थ 
शुक्रवारी दुपारी चिन्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्याने त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. कारागृह प्रशासनाने याबाबत माहिती दिल्यानंतर त्याचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचताच चिन्याचा मृत्यू झाल्याचे त्यांना कळले व संताप झाला. 

भेट नाकारल्यानंतर मृत्यू 
शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास चिन्याची पत्नी टिनाबाई व मुलगा साई त्याला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, कारागृहातील रक्षकांनी त्यांना भेट नाकारली आणि दुपारी रुग्णालयात गेल्यानंतर थेट मृत्यूचीच माहिती मिळाल्याने ते हादरले. 

मारहाणीत मृत्यूचा आरोप 
मृतदेह पाहिल्यानंतर चिन्याचे कपडे फाटलेले व चिखलाने भरल्याचे दिसले. त्याच्या खांद्यावर मारहाणीच्या जखमा असल्याने कारागृहातील पोलिसांनीच त्यांना मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप चिन्याच्या पत्नीने केला. 

 

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला. या वेळी त्याच्या कुटुंबियांनी चिन्याचे विच्छेदन ‘इन कॅमेरा’ करावे, तसेच कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली; अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. 

दारू न मिळाल्याने चिन्या अस्वस्थ 
यासंदर्भात कारागृह प्रशासनाशी संपर्क साधला असता, चिन्या व्यसनी होता. त्याला दारूचे व्यसन होते. काही दिवसांपासून दारू मिळत नसल्याने तो अस्वस्थ होता. त्यातच त्याची शुक्रवारी प्रकृती बिघडली व त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Suspect dies in chopper attack case from district jail