esakal | रखडलेल्या चौपदरीकरणाची गडकरींकडून दखल 
sakal

बोलून बातमी शोधा

tarsod fagne highway

महाराष्ट्र क्रेडाईतर्फे बांधकाम क्षेत्राच्या समस्या, सिमेंट व अन्य साहित्याचे वाढते दर आणि पायाभूत सुविधांच्या कामांबाबत नुकताच वेबिनार झाला. त्यात नितीन गडकरी प्रमुख वक्ते होते. राज्यातील क्रेडाईचे चार-पाचशे सदस्य व तीन पॅनालिस्ट सहभागी झाले होते.

रखडलेल्या चौपदरीकरणाची गडकरींकडून दखल 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : काम सुरू होण्याआधी अगदी निविदा प्रक्रियेपासूनच ग्रहण लागलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील फागणे-तरसोद टप्प्यातील कामाची आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. काम वर्षभरात पूर्ण करण्यासंबंधी सूचना देत असल्याचे त्यांनी महाराष्ट्र क्रेडाईतर्फे झालेल्या वेबिनारमध्ये सांगितले. 
महाराष्ट्र क्रेडाईतर्फे बांधकाम क्षेत्राच्या समस्या, सिमेंट व अन्य साहित्याचे वाढते दर आणि पायाभूत सुविधांच्या कामांबाबत नुकताच वेबिनार झाला. त्यात नितीन गडकरी प्रमुख वक्ते होते. राज्यातील क्रेडाईचे चार-पाचशे सदस्य व तीन पॅनालिस्ट सहभागी झाले होते. वेबिनारमध्ये महामार्ग चौपदरीकरणाचा मुद्दा क्रेडाई सदस्याने उपस्थित केला. 

अनेक वर्षांपासून प्रलंबित 
राष्ट्रीय महामार्गावर नवापूर-अमरावती साडेचारशे किलोमीटरच्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०१२ पासून प्रलंबित आहे. तेव्हा एल ॲन्ड टी कंपनीला त्याचे कंत्राट दिले होते. किरकोळ कामानंतर ते बंद पडले. पुढे आयएलएफ ॲन्ड एस या एजन्सीकडे कामाचे कंत्राट गेले. ती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बंद पडली. नंतर चार टप्प्यांत काम विभागले जाऊन धुळे व जळगाव जिल्ह्यांतील फागणे- तरसोद व तरसोद- चिखली असे दोन टप्पे झाले. 

फागणे-तरसोद ठप्पच 
या दोघा टप्प्यातील कामांच्या निविदा दोनदा प्रसिद्ध झाल्यानंतर त्या मंजूर झाल्या. पैकी तरसोद-चिखली कामाने सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या दीड-दोन वर्षांत चांगली गती घेत ६५ ते ७० टक्के काम पूर्णत्वास नेले. मात्र, फागणे-तरसोद टप्प्याचे काम रखडले आहे. शिवाय या टप्प्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचीही चाळणी झाली आहे. त्यामुळे याबाबत ‘क्रेडाई’च्या वेबिनारमध्येही मुद्दा उपस्थित झाला. 

गडकरींनी दिल्या सूचना 
या सूचनेची दखल घेत गडकरींनी या कामासंबंधी संबंधित विभागाला सूचना दिल्याचे सांगितले. सुरवातीला या कामाचे कंत्राट ज्या मक्तेदाराकडे होते, त्याच्याकडून काढून घेण्यात आले व अन्य कंत्राटदार नेमण्यात आला. त्यानंतरही काम पूर्णपणे सुरू झालेले नाही. त्यामुळे हे काम किमान वर्षभरात पूर्ण व्हावे, त्यासाठी सूचना देत असल्याचे गडकरींनी क्रेडाईच्या टीमला सांगितले. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image