शिक्षकांच्या कल्पनेला तरुणांची साथ, आणि बोलू लागल्या शौचालयांच्या भिंती 

अमोल पाटील
Sunday, 16 August 2020

येताना जाताना कुठेही नजर गेली तरी मुलांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याला चांगल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे.

अमळनेर : एखाद्याने चांगले काम केले आणि तरुणांनी त्याचे अनुकरण केले की गावाचा कायापालट होतो.तसाच काहीसा प्रकार मंगरूळ (ता.अमळनेर) गावाने सिद्ध केले असून स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या वैयक्तिक शौचालयाच्या भिंतींवर ज्ञान व माहिती साकारून मंगरूळ हे शिक्षणाचे गाव असल्याची ओळख गावाने निर्माण केली आहे. 

अमळनेर शहराच्या पश्चिमेला चार किमी अमळनेर-धुळे रस्त्यावर असलेले तालुक्यातील मोठे गाव म्हणून मंगरूळ परिचित आहे. दोन वर्षांपूर्वी मंगरूळ येथील कै. अंबर राजाराम पाटील माध्यमिक विद्यालयाचे कल्पक शिक्षक संजय पाटील व इतर शिक्षकांनी शाळेच्या भिंती रंगवून त्यावर गणिताची सूत्रे , इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , हिंदी साहित्य , विज्ञानाची माहिती रेखाटून भिंती बोलक्या केल्या होत्या. त्याच शाळेतील माजी विद्यार्थी तसेच गावातील इतर तरुणांनी एकत्र येत मंगरूळ विकास मंच ची स्थापना केली. पाणी फौंडेशन मध्ये सहभाग घेतला गाव पाणीदार करण्याचा प्रयत्न तर केला मात्र, गावातील मूले चांगले शिकले पाहिजे म्हणून त्यांनी एकत्र येत स्वच्छ भारत अभियांनातर्गत गावात बांधलेल्या शौचालयांच्या भिंतींचा व इतर भिंतींचा उपयोग करत त्यांना रंगवून त्यावर गणित , मराठी , सामाजिक ज्ञान , राष्ट्रीय संदेश , पाणी वाचवा , वैज्ञानिक माहिती , चांगल्या सवयी, काल मापन आणि काळानुसार लुप्त होत चाललेली माहिती साकारून संपूर्ण गाव बोलके केले आहे. येताना जाताना कुठेही नजर गेली तरी मुलांच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याला चांगल्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. गावात आलेल्या पाहुण्याला , अधिकाऱ्यांना त्याचे आकर्षण ठरणार आहे.

पाणीदार मंगरूळ होण्यासाठी तरुण एकत्र आले होते. श्रमदान केले होते त्या कामातील देणगीतून उरलेली रक्कम आणि गावातील नोकरीला लागलेले तरुण एकत्र येत या कामासाठी मदत करीत आहेत. गावातील भावी पिढी सुसंस्कृत होऊन भविष्यात तरुणांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊन त्यांनी आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलू नये असा त्यामागचा उद्देश आहे. गाव करी ते राव काय करी हे गावातील तरुणांनी दाखवून दिले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी प्राथमिक व माध्यमिक च्या मुलांना गावात फिरून सुद्धा ज्ञान मिळणार आहे खान्देशातील हे एक आकर्षण ठरले आहे.

 

कोरोना मुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून गावातील तरुणांच्या मदतीने हा प्रयन्त केला आहे.इतर गावांनीही यांचे अनुकरण करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवता येऊ शकते.
- संजय पाटील माध्यमिक शिक्षक मंगरूळ ता अमळनेर.

 

संपादन- भूषण श्रीखंडे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon teacher idea drew the study information on the village walls