तहसीलादारांनी पकडला वाळू डंपर...आणि सापडल्या शेगावच्या पावत्या  

रईस शेख
Tuesday, 4 August 2020

गिरणा नदीतून रात्रंदिवस वाळूचे बेकायदा उत्खनन करून त्याची बिनबोभाट वाहतूक सुरू आहे. आजपर्यंत होणाऱ्या चोरीच्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी बनावट पावत्यांचा आधार घेतला जात होता.

जळगाव : गिरणेतून बेसुमार वाळूउपसा करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यासाठी वाळूमाफियांनी शेगाव (ता. बुलढाणा) येथील वाळूपावत्या चलनात आणल्या आहेत. तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दोन वाहने ताब्यात घेतली असून, त्यांच्याजवळ शेगावच्या पावत्या आढळून आल्या. आहे.   जिल्‍हा प्रशासनाने केलेल्या कारवाईत पावत्या ताब्यात घेऊन ‘एमआयडीसी’ पोलिस ठाण्यात वाहने लावली आहेत. जप्त वाहने विद्यमान नगरसेवकाची असल्याची माहिती समोर आली.
 
जळगाव जिल्ह्यातील वाळूमाफियांची प्रशासनावर मजबूत पकड असून, प्रचंड दबदबा आहे. राजकीय नेत्यांनाही वाळू व्यावसायिकांनी आपल्यासोबत घेतल्याने वाटेल तसे प्रशासनास वाकवून वाळूमाफियांनी प्रस्त वाढवले आहे. शासकीय कामाची परवानगी वगळता वाळू ठेके बंद असताना, गिरणा नदीतून रात्रंदिवस वाळूचे बेकायदा उत्खनन करून त्याची बिनबोभाट वाहतूक सुरू आहे. आजपर्यंत होणाऱ्या चोरीच्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी बनावट पावत्यांचा आधार घेतला जात होता.

आता चक्क बुलढाणा जिल्‍ह्यातील शेगाव तहसील अंतर्गत वाळूच्या पावत्यांच्या आधारे गिरणेवर डाका टाकण्यात येत आहे. सोमवारी तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने दोन डंपर ताब्यात घेऊन ते ‘एमआयडीसी’ पोलिसांत आणले. दोन्ही वाहनांवरील चालकांजवळ शेगावच्या पावत्या आढळून आल्याची माहिती असून, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. शेगावच्या पावत्यांविषयी प्रांताधिकारी दीपमाला चौरे आणि तहसीलदार वैशाली हिंगे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन ‘नॉट रिचेबल’ होता. 

वाळूमाफियांचा वाद 
दोन डंपर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर वाळू व्यावसायिक आणि संबंधित नगरसेवकाने ‘एमआयडीसी’ पोलिस ठाणे गाठून वाहने सोडवण्याचा प्रयत्न केला. एकाशी वादही झाला. तहसीलदारांच्या पथकाने ताब्यात घेतलेला डंपर (एमटीएस ९५९६) व (एमएच १९, झेड ५२०१) आणल्याची माहिती ‘एमआयडीसी’ पोलिसांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Tehsildar seized sand dumper, Receipts of Shegaon found