घंटा वाजली... पण विद्यार्थ्यांची दांडी

सचिन जोशी
Tuesday, 8 December 2020

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले असले तरी राज्यातील शाळा १६ मार्चपासूनच बंद होत्या. तब्बल आठ महिने शाळा बंद राहिल्यानंतर कोरोनाचा प्रभाव सौम्य झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जळगाव : कोरोना संसर्गामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शहरातील शाळांची घंटा आज वाजली.. शाळेचा पहिलाच दिवस, त्यातही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज ‘भारत बंद’ची हाक दिल्याने या बंदचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला. सरासरी दहा टक्केच विद्यार्थी हजर होते. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाले असले तरी राज्यातील शाळा १६ मार्चपासूनच बंद होत्या. तब्बल आठ महिने शाळा बंद राहिल्यानंतर कोरोनाचा प्रभाव सौम्य झाल्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी २३ नोव्हेंबरला शाळा सुरु होणार होत्या, मात्र तो मुहूर्त टळला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने आदेश काढल्यानंतर मंगळवारपासून (ता.८) जिल्ह्यातील ९वी ते १२वीचे वर्ग सुरु झाले. 

‘भारत बंद’चा फटका 
शाळेचा आज पहिलाच दिवस होता. जळगाव शहरातील शाळा आजपासून सुरु झाल्या. मात्र, शेतकरी आंदोलनासाठी आज आयोजित ‘बंद’चा फटका शाळांच्या उपस्थितीला बसला. जवळपास ५० टक्क्यांपेक्षा जास्त पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीमत्र दिले असले तरी प्रत्यक्षात आज विविध शाळांमध्ये सरासरी १० टक्केच विद्यार्थी हजर होते. 

अशी झाली सुरवात 
एरवी १५ जूनला सुरु होणारी शाळा या शैक्षणिक वर्षात सुरुच झाली नव्हती. त्यातही शहरातील बहुतांश शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरु केलेच होते. मात्र, आज प्रत्यक्षात शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे दरवर्षी १५ जूनला जसे विद्यार्थ्यांचे स्वागत होते, तशी गर्दी व जल्लोष नसला तरी काही शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले. 

सॅनिटायझर व तपासणी 
कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होणार असल्याने त्याबाबतचे शासनाकडून आलेले सर्व दिशानिर्देश विविध शाळांमध्ये पाळण्यात आले. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांची थर्मल गट, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात आले. मास्क घालूनच प्रवेश देण्यात आला. वर्गात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगद्वारे प्रार्थनेचे सत्रही पार पडले. एका बाकावर एकच विद्यार्थी अशी रचना करण्यात आली होती. प्रत्यक्षात वर्गात अगदी मोजकेच विद्यार्थी हजर असल्याने बरेचसे बेंच रिकामेच होते. 

बसमथील चित्रही ओस 
एरवी व्हॅन व बसमध्ये खच्चून विद्यार्थी बसलेले असताना आज मात्र उलट चित्र होते. दूरवरील शाळांमध्ये बस, व्हॅनची व्यवस्था होती. मात्र, बसच्या एका सीटवर एकच विद्यार्थ्याला बसविण्यात आले. अर्थात, काही बस तर अगदीच पाच-सात विद्यार्थ्यांनाच घेऊन गेल्या. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon today school open but student not attendance