esakal | ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijit_Raut

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट’ त्रिसूत्रीचा राऊत पॅटर्न !

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोना महामारीच्या युध्दात कोरोना बाधितांच्या शोध घेवून त्यांना लवकरात लवकर दाखल करून उपचार करणे अर्थात ‘ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट’ ही त्रिसूत्री अवलंबिल्यानेच बाधितांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढता येणे शक्य झाले. जिल्हा रुग्णालयाची नकारात्मक प्रतिमा दूर होऊन आता अत्याधुनिक सुविधा देणारे शासकीय कोविड रुग्णालय असे नावारूपास आणले आहे. हाच ‘जिल्हाधिकारी राऊत पॅटर्न’ कोरोना बाधितांचे प्राण वाचवित आहे.

हेही वाचा: अशिक्षितांकडून रॅपिड कोरोना चाचण्या; नागरिकांच्या जिवाशी खेळ

गतवर्षी कोरोना महामारीसोबत युध्द सुरू झाले. त्यात जिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टर, कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची झालेली फरफट, एका वृद्धेच्या सात दिवसांनी रुग्णालयातील स्वच्छतागृहात सापडलेल्या मृतदेहामुळे रुग्णालयाची लक्तरे देशाच्या वेशीवर टांगली. त्यानंतर महामारीच्या काळात सर्वाधिक कोरोना बाधितांचा मृत्यू जळगाव जिल्ह्यात झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरेसह पाच डॉक्टर निलंबित झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची बदली झाली. नंतर सांगलीचे सीईओ अभिजीत राऊत यांनी जिल्हाधिकारी पदाचे सूत्रे स्वीकारली. आता कोरोना महामारीच्या निमित्ताने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली. यंत्रणेकडे इन्फ्रास्ट्रक्चरही पुरेसे आहे, कमी आहे ती मनुष्यबळाची.

जिल्हाधिकारी ‘ॲक्शन मोड’मध्ये

जिल्हा रुग्णालयातील ढेपाळलेल्या यंत्रणेला ठिकाणावर आणण्यासाठी श्री.राऊत यांनी रुग्णालयात अचानक तपासणी करणे, रुग्णांना योग्य ट्रीटमेंट, जेवण नाश्‍ता, इंजेक्शन मिळाले की नाही याची विचारपूस करण्याचा धडाका लावला. यामुळे रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफवर धाक निर्माण झाला व सुविधा सज्ज झाल्यात.

hospital visit

hospital visit

मृत्यूदरावर नियंत्रण

रुग्णांसह खासगी, शासकीय डॉक्टरांना विश्वासात घेत, प्रत्येक समस्येवर नावीन्यपूर्ण उपाय शोधत मृत्युदरावर नियंत्रण मिळवले. त्या उपाययोजना सध्याच्या तीव्र लाटेतही जळगावकरांसाठी दिलासादायक ठरत आहेत. जूनमध्ये जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा धक्कादायक होता. रुग्णांवर वेळेवर उपचाराअभावी रुग्ण दगावत होते. जिल्हाधिकारी राऊत यांनी ही बाब हेरीत जिल्हास्तरावर तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार केला. वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर्स, खासगी रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था अशा सगळ्यांशी संवाद, समन्वय साधून विपरीत परिस्थितीत मृत्युदर रोखण्यात, कमीत कमी करण्यात यश मिळविले.

रुग्णालये केली अधिग्रहित

डॉ. उल्हास पाटील रुग्णालय, इकरा युनानी महाविद्यालय, देवकर महाविद्यालय कोरोना बाधीतांसाठी अधिग्रहीत करण्यात आले. जिल्हा कोविड रूग्णालयात बेड पूर्ण झाल्यानंतर इतर अधिग्रहीत रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू झाले. सोबत खासगी रूग्णालयांना कोविडच्या रूग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे जिल्हा रुग्णालयावरील रूग्णांचा ताण काहीसा कमी झाला.

हेही वाचा: सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

जिल्हास्तरावर टास्क फोर्स

जिल्हापातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स नेमला. दररोज नव्याने आलेल्या समस्यांवर हा टास्क फोर्स अभ्यासपूर्ण, व्यवहार्य उपाय सुचवत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी त्यादृष्टीने तत्काळ निर्णय घेण्याची राहिली. यामुळे समस्यांचे निराकरण अचूक व वेगवान झाले.

‘बेडसाइड असिस्टंट’ उपक्रम

रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात रुग्णाचे अपघात होण्याच्या घटना टाळण्यासाठी बेडसाइड असिस्टंट ही नवी कल्पना जळगाव जिल्ह्यात राबविण्यात आली. कंत्राटी स्वरूपात ही विशेष टीम काेविड रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आली. त्यातून रुग्णांना अडचणी आल्यास त्याचे जागेवरच निराकरण होत असे किंवा तात्काळ डॉक्टरांना माहिती देवून उपचार सुरू आहेत.

खासगी डॉक्टरांचा सहभाग

खासगी डॉक्टरांशी बोलून त्यांच्या कडे तपासणीकडे मात्र संशयित असलेल्या रुग्णांची माहिती घेत गेलो. त्यामुळे त्यांची चाचणी करून ते बाधीत आढळले तर त्यांना दाखल करून उपचार करण्यात आला. एक रुग्ण आढळला त्याच्या संपर्कातील २० जणांची तपासणीची शोध मोहीम आखल्याने अनेक रुग्ण सापडले. रुग्णांना आवाहन करण्यात आले की ‘लक्षणे दिसताच चाचणी करा, दाखल व्हा, उपचार करा व लवकर बरे होवून घरी जा’ असा सल्ला देण्यात आला. दुसरीकडे लवकर आले तर बरे व्हाल, उशिरा आले तर उपचारास उशिर झाल्याने काहीही होऊ शकते असा सल्ला देण्यात आला. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील बंद केलेली सर्व सीसीसी, डीसीएचसी, डीएससी सेंटर सुरू झाली. सर्व ठिकाणी ऑक्सीजन, औषधांचा साठा वाढविला.

मोहाडीत पाचशे खाटांचे रुग्णालय

जिल्हा कोविड रुग्णालय, डॉ.पाटील रुग्णालय, इकरा महाविद्यालय, देवकर महाविद्यालय सोबतच आता मोहाडी येथे ५०० खाटांचे रुग्णालय तयार होत आहे. त्यात २०० बेड ऑक्सीजनचे तर ३०० बेड सीसीसी सेंटरचे असतील. तूर्त ८० ऑक्सीजनचे बेड कार्यान्वीत आहे. तर १०० बेडवर सामान्य स्थितीतील कोवीड रुग्णांसाठी आहेत.

corona test

corona test

लोकसहभागाचा पॅटर्न

रुग्णसंख्या वाढल्याने तालुकास्तरावर सीसीसी सेंटर, डीसीसीसी सेंटर सुरू करण्यात आले. त्यात लोकसहभागातून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, सॅनिटायझर, पीपीई किट उपलबध करण्यात आले. जेणेकरून तालुक्यातील रुग्णांवर तालुक्यातच उपचार सुरू झाले.

ऑक्सिजन प्लँट सज्ज

कोरोनाबाधितांस ऑक्सिजन अधिक लागतो. ऑक्सिजन प्लांटच जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आल्याने खर्च कमी झाला. रुग्णांच्या बेडपर्यंत अल्पदरात ऑक्सिजन पोचत आहे.

दीडशे कोटींचा खर्च

जिल्हा आरेाग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आतापर्यंत दीडशे कोटीच्या वर खर्च शासनाने, जिल्हा नियोजन समितीतून व लोकसहभागातून केला आहे. आता रुग्णसंख्या वाढत आहे. त्यावर उपचारासाठी वैद्यकीय स्टाफ अपुरा पडतोय. स्टाफ भरला की वाढत्या रुग्णांवर उपचार करता येणार आहेत.

हेही वाचा: वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’

टास्क फोर्स, जिल्हा परिषद सीईओ, जिल्हा शल्यचिकित्सक, जीएमसीचे अधिष्ठाता, डॉक्टर्स, सामाजिक संघटना, आयएमए यांचे योगदान मोलाचे आहे. ‘ट्रीपल टी’ हेच सूत्र रुग्णांच्या शोधापासून तातडीचे उपचार करण्यापर्यंत लागू केले. हाच उपाययोजनांचा प्रभावी पॅटर्न आहे.

- अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी)

संपादन- भूषण श्रीखंडे