esakal | अशिक्षितांकडून रॅपिड कोरोना चाचण्या; नागरिकांच्या जिवाशी खेळ
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

अशिक्षितांकडून रॅपिड कोरोना चाचण्या; नागरिकांच्या जिवाशी खेळ

sakal_logo
By
विनोद सुरवाडे

अशिक्षितांकडून रॅपिड कोरोना चाचण्या; नागरिकांच्या जिवाशी खेळ

वरणगाव : येथे कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढल्याने नगर परिषद व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. मात्र, जे टेक्निशियन चाचणी करून घेत आहेत, त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्रच नसल्याने संबंधित विभाग कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या जिवाशी खेळ करताना दिसून येत आहेत.

हेही वाचा: सोने पुन्हा चकाकणार..प्रतितोळा ५० हजार भाव जाणार !

जिल्ह्यासह सर्वत्र कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातले असून, वरणगाव येथेही तशीच परिस्थिती बघायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर परिषद व पोलिसांच्या संयुक्त दक्षतेनुसार शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांची रॅपिड ॲन्टिजेन कोरोना चाचणी केली जात असून, यातून विनाकारण फिरणाऱ्यांचेही प्रमाण कमी होत आहे आणि शहरांत बाधित झालेले रुग्णदेखील मिळण्यास मदत होत असली तरी शासन नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. शहर व परिसरातील कोरोनासदृश परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हास्तरावरून त्याच दृष्टीने नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, पोलिस प्रशासनाचे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा हेंडवे यांनी संयुक्त विचाराधीन शासकीय नियम पाळून निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने संचारबंदी असताना विविध कारणे सांगून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करावी, त्यामुळे बाहेर फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल आणि खरे संसर्ग झालेले बाधितसुद्धा मिळतील, असे नियोजन करण्यात आले. नगर परिषदेने कर्मचाऱ्यांसह रॅपिड ॲन्टिजेन किट पुरविणे, पोलिस कर्मचाऱ्यांनी रिकाम्या फिरणाऱ्यांना पकडून आणणे आणि आरोग्य विभागाने प्रशिक्षण घेतलेल्या टेक्निशियनद्वारे त्यांची टेस्ट करावी. टेक्निशियनने प्रक्रिया करून ती व्यक्ती निगेटिव्ह आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, असा अहवाल तयार करणे, असे नियोजनबद्ध कार्य सुरू झाले.

हेही वाचा: वृध्द‘सुदामा’भिक्षेकरीला..भगवान श्रीरामांमुळे मिळाला‘महाल’

तीन दिवसांपासून टेस्ट..

आरोग्य विभागाच्या वरणगाव ग्रामीण रुग्णालयात ही टेस्ट करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेला किंवा त्या क्षेत्रातील टेक्निशियन उपलब्ध नसल्याचे डॉ. हेंडवे यांनी या विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असतानादेखील पालिकेचे व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करीत रुग्णालयातील रोजंदारीवर काम करणाऱ्या इरफान पटवे, सुनील भालशंकर आणि भय्या तायडे (कोळी) यांना आठ रुपये टेस्टप्रमाणे आमिष दाखवून टेस्ट करण्याचे सांगितले. मात्र, या तिघांकडे या टेस्टसंबंधी कोणतेही प्रशिक्षण घेतल्याचा पुरावा नसताना तीन दिवसांपासून हे तिघे टेस्ट करीत आहेत. या परिस्थितीत सुदैवाने टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही; परंतु दुर्दैवाने बाधित रुग्ण जर आढळला असता तर सोबतीला सर्व बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली असती. या व्यवस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: राज्यात जळगावचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वांत कमी

नगर परिषद, पोलिस प्रशासन आणि आमच्या विभागांतर्गत फिरस्ती पथके तयार करून नागरिकांच्या रॅपिड ॲन्टिजेन कोरोना चाचणीचे नियोजन केले होते. मात्र, आमच्याकडे टेस्ट करणारी टेक्निशियन व्यक्ती उपलब्ध नसल्याने चाचण्या करता येणार नाहीत, असे दोन्ही विभागांना कळविले होते. त्यामुळे शहरात होत असलेल्या कोरोना टेस्टमध्ये आमच्या आरोग्य विभागाचा संबंध नाही.

-डॉ. क्षितिजा हेंडवे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, वरणगाव

शहरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी नगर परिषदेच्या माध्यमातून रॅपिड ॲन्टिजेन किटचा पुरवठादेखील केला आहे. मात्र, आमच्या विभागाकडे टेस्टिंग टेक्निशियन प्रशिक्षित आहे किंवा नाही, अशी माहिती नाही. त्यामुळे या परिस्थितीबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेऊ.

-सौरभ जोशी, प्रभारी मुख्याधिकारी, नगर परिषद, वरणगाव

संपादन- भूषण श्रीखंडे