सेवारथ परिवाराचे दातृत्व; कोविडसाठी अडीचशे बेड, ऑक्सिजनची यंत्रणा 

देविदास वाणी
Wednesday, 22 July 2020

मोहाडी येथे प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयात अद्याप यंत्रणा नाही. या रुग्णालयातही ऑक्सिजनयुक्त १०० बेडची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.

जळगाव  : कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असताना आता रुग्णांसाठी बेडही उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आवाहनाला समाजातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, सेवारथ परिवाराने विविध दात्यांच्या माध्यमातून जळगाव सामान्य रुग्णालयासह चोपडा व यावल रुग्णालयासाठी अडीचशेवर ऑक्सिजनयुक्त बेडसह आयसीयू बेड दिले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार सेवारथ परिवाराने समन्वय साधत समाजातील काही दानशूर लोकांकडून साहित्य, निधी जमा करत सामान्य रुग्णालयासाठी ५५ नवीन बेड, ५५ बेडसाठी ऑक्सिजन पुरवठा करणारी पाइपलाइन, २० आयसीयू बेड, अन्य ९० बेडसह ऑक्सिजन पाइपलाइन व यावल व चोपडा रुग्णालयात प्रत्येकी ५० बेडची उभारणी सुरू केली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक पुखराज पगारिया, उद्योजक कृष्णा पाटील, रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षा अपर्णा भट व महेंद्र रायसोनी, इनरव्हील क्लबने ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. 

सेवारथ परिवाराची मदत 
याकामी सेवारथ परिवारातील डॉ. नीलिमा सेठिया, दिलीप गांधी, ज्योत्स्ना रायसोनी, चंद्रशेखर नेवे, डॉ. रितेश पाटील यांनी समन्वय साधत ही यंत्रणा उभी केली. 

महिला रुग्णालयही सज्ज करणार 
मोहाडी येथे प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयात अद्याप यंत्रणा नाही. या रुग्णालयातही ऑक्सिजनयुक्त १०० बेडची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज असून, पाच ते सहा दिवसांत हे बेड सज्ज असतील, अशी माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली.  

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Two hundred and fifty beds for covid, oxygen system Charity by Sevarath family