esakal | जळगावातील ऑक्सिजन टँक सुरक्षित; २४ तास सुरक्षारक्षक

बोलून बातमी शोधा

oxigen tank
जळगावातील ऑक्सिजन टँक सुरक्षित; २४ तास सुरक्षारक्षक
sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन टँक गळतीमुळे २२ रुग्णांच्या मृत्यूची हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर जळगाव जिल्ह्यातही अशाप्रकारचे दोन मोठे टँक असून, ते सुरक्षित व तंत्रज्ञांच्या पूर्ण निगराणीखाली असल्याची खातरजमा ‘सकाळ’ने करून घेतली.

हेही वाचा: कोलकातामधील झपाटलेल्या ठिकाणांची आहे रहस्यमय, रंजक कथा

नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकची गळती होऊन कोविड कक्षातील ऑक्सिजनवर असलेल्या २२ रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. १२) दुपारी घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील अशा स्वरूपाच्या टँकच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

img

शासकीय रुग्णालयातील टँक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात २० किलोलिटरचा जम्बो ऑक्सिजन टँक उभारला आहे. त्याला सुरक्षेसाठी कंपाउंड केले असून, त्याठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक तैनात असतो. या टँकच्या देखभाल, दुरुस्ती व तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी तंत्रज्ञ सज्ज आहेत. याशिवाय, रोज लागणारा ऑक्सिजन, शिल्लक साठा, नव्याने नोंदविलेली मागणी यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘ओ-२’ समितीही नियुक्त आहे.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

अधिष्ठातांकडे सायंकाळी येते माहिती

या टँकची क्षमता २० किलोलिटरची असून, सामान्य रुग्णालयात सध्या रोज सात ते आठ किलोलिटर ऑक्सिजन लागतो. रोजचा वापर, साठ्याची माहिती रोज सायंकाळी पाचला अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे येते.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील टँक

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात प्रत्येकी १३ किलोलिटर क्षमतेचे दोन ऑक्सिजन टँक आहेत. याठिकाणी तीन शिफ्टमध्ये २४ तास सुरक्षारक्षक असतो. रुग्णालयाने प्राक्झएअर कंपनीशी करार केला असून, या कंपनीकडून द्रवरूप ऑक्सिजन टँकरद्वारे या टँकमध्ये भरण्यात येतो. नंतर व्हेपोरायजरने कॉपर पाइपलाइनद्वारे रुग्णांपर्यंत पोचविला जातो. २६ पैकी २४ टन ऑक्सिजन वापरला जातो. दोन टन साठा बफर (राखीव) असतो. साठा संपण्याआधीच मागणीनुसार लिक्विड ऑक्सिजन प्राप्त होतो. या सर्व व्यवस्थेवर तंत्रज्ञ अशोक बऱ्हाटे लक्ष ठेवून आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे