esakal | शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले..आणि मग सापडला खुनाचा संशयित
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

शंभरावर सीसीटीव्ही फुटेज तपासले..आणि मग सापडला खुनाचा संशयित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नंदुरबार : बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ बिहारच्या (Bihar) युवतीचा निघृण खून (Murder) करणाऱ्या संशयित बिहारी युवकास कोणतेही पुरावे अथवा सुगावा नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नंदुरबार ते सुरत (Surat) रेल्वेमार्गावरील रेल्वस्थानकावर असलेले शंभरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज (CCTV camera) तपासल्यानंतर अखेर संशयिताबाबत धागा सापडला. त्या धाग्याने अखेर पोलिसांना (Police) संशयितापर्यंत पोचवत सुरत (गुजरात) येथून सोमवारी अटक केली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेची सज्जता

बिलाडी रस्त्यावरील नंदुरबार शिवारातील गट क्र. ४९८ च्या शेताच्या बांधाजवळील रेल्वे ट्रॅकजवळ झाडाझुडपात २६ ऑगस्टला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. मृत महिलेचा एक हात धडापासून वेगळा व एका हातावर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या जखमेच्या खुणा होत्या. याबाबत नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक कळमकर यांना तपासाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या.

हेही वाचा: कोरोनामुळे २२ लाख मुले शाळाबाह्य-आमदार डॉ. सुधीर तांबे

अन.. बिलावर आढळला मोबाईल नंबर
२९ ऑगस्टला निरीक्षक कळमकर यांनी पाचोराबारी येथील रेल्वे फाटकाजवळील कल्पेश पटेल यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, त्यात २४ ऑगस्टच्या रात्री एक तरुण व तरुणी नंदुरबारकडे जाताना दिसले. मृत युवतीचे कपडे मिळतेजुळते होते. ढेकवद रेल्वे ट्रॅकमननेही सुरत-भुसावळ पॅसेंजरमधून ते उतरल्याचे पाहिले होते. पाचोराबारी ते सुरतदरम्यान २१ सीसीटीव्ही फुटेज तपासले. ३१ ऑगस्टला सुरत रेल्वेस्थानक व बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमध्येही रेल्वे प्लॅटफॉर्मवर तरुण-तरुणी दिसून आले. एका ठिकाणी रिक्षातून उतरतानाही तेच दिसले. रिक्षाचालकाच्या मदतीने त्यांचे मार्गक्रमण निश्चित केले. एका ठिकाणी त्यांनी रिक्षा बदलली. त्या रिक्षाचालकाच्या मदतीने पुन्हा पुढचा मार्ग शोधला. ते कापुदरा चौक, केंब्रिज ब्रीज येथे रिक्षात बसताना दिसले. शनिवारी (ता. ४) नवागांम, सुरत येथील अल्ट्रा लाइफ स्टाईल या कपड्याच्या दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुण व तरुणी दिसून आली. दुकान मालकाकडून कपड्यांच्या बिलावरील मोबाईल क्रमांक मिळाला. त्याच्या लोकेशनवरून रविवारी (ता. ५) विनयकुमार रामजनम राय (वय ३८, रा. खमहौरी, पो. राजापूर, ता. महाराजगंज, जि. सिवन, बिहार) यास अटक केली.

हेही वाचा: दराणे येथील तरुणाचा खून; ग्रामस्थांनी दीड तास रोखला रस्ता


राय याने तरुणीचे नाव सीताकुमारी समदकुमार भगत (२४, रा. चमारिया चैनपूर, ता. मशरक, जि. छपरा) असे सांगितले. दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संबंधित तरुणी २३ ऑगस्टला बिहारहून सुरतला आली. तरुणीने तरुणाकडे विवाहासाठी तगादा लावला. त्या वेळी राय याने आपण विवाहित असल्याचे सांगितल्याने त्यांच्यात वाद झाला. २४ ऑगस्टला तरुणीस पुन्हा बिहारला सोडण्यासाठी सुरतहून सुरत-भुसावळ पॅसेंजरने ते रवाना झाले. रेल्वेमध्येही तरुणी वाद घालत असल्याने संशयित ढेकवद येथे उतरला. तरुणीही उतरली. दोघे चालत गेल्यानंतर संशयिताने अंधाराचा फायदा घेत बिलाडी शिवारात रेल्वे ट्रॅकजवळ एका शेतातील बांधाच्या बाजूला काटेरी झुडपात नेऊन तरुणीचा ब्लेडने गळा चिरून ठार केल्याचे कबूल केले.

loading image
go to top