मध्यरात्रीचा थरार..गावाकडे येण्यासाठी केली कार; गाव येताच त्‍यांनी केला हा प्रकार

रईस शेख
Sunday, 13 September 2020

सिडको बसस्टॅण्डवरुन औरंगाबाद ते जळगाव (उमाळा) अशा प्रवासासाठी चार तरुण आले. भाडे ठरवल्यानंतर प्रवासाला सुरवात झाली. मध्यरात्री साडेबारा वाजता उमाळा येथे पोचल्यावर चौघे प्रवासी खाली उतरले.

जळगाव : औरंगाबाद येथील ट्रॅक्सीचालकाला औरंगाबाद ते उमाळा भाडे ठरवून चार तरुण कारमध्ये बसले. त्यांनी मध्यरात्री उमाळा गाठल्यावर चालकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्या खिशातून साडेचार हजार रुपये रोख, दहा हजारांच्या मोबाइलसह कार घेऊन चौघांनी पेाबारा केला. या घटनेत एमआयडीसी पेालिसांत गुन्ह्याची नोंद होऊन चार पैकी दोन संशयितांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. कारचालक भागवत मुळे यांनी प्रवासाअगोदर चौघांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉटसॲपवर पाठवल्याने तपासात मदत झाली. 

औरंगाबाद सिडकेा येथील रहिवासी भागवत रामभाऊ मुळे (वय ४५) टोयाटा कारने प्रवासी वाहतूक करून उदरनिर्वाह चालवतात. गेल्या बुधवारी (ता. ९) रात्री नऊच्या सुमारास सिडको बसस्टॅण्डवरुन औरंगाबाद ते जळगाव (उमाळा) अशा प्रवासासाठी चार तरुण आले. भाडे ठरवल्यानंतर प्रवासाला सुरवात झाली. मध्यरात्री साडेबारा वाजता उमाळा येथे पोचल्यावर चौघे प्रवासी खाली उतरले. आपले उर्वरित पैसे घेण्यासाठी चालक भागवत मुळेही खाली उतरले, तेव्हा एकाने त्यांना गाडीची चावी मागितली. त्यांनी नकार देताच दुसऱ्याने डोळ्यात मिरचीपूड फेकून मुळे यांना मारहाण केली व खिशातून साडेचार हजार रुपये रोख, दहा हजारांचा मोबाइलसह कार घेऊन चौघांनी पोबारा केला. यावेळी मुळे यांनी आरडाओरड केल्यानंतर काही ग्रामस्थ मदतीला धावून आले. घटनेची माहिती कळवल्यावर पेालिसांनी धाव घेतली. चालकाला उपचारार्थ दाखल केल्यानंतर आज मुळे यांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील हे संशयितांचा शोध घेत आहे. 

चौघांचे फोटो काढल्याचा फायदा 
महागड्या वाहनांवर एकटे असल्याने चालकांकडून प्रवास करणाऱ्यांचे फोटो काढून सुरक्षित नंबरवर पाठवले जातात. अप्रिय घटना घडू नये किंवा गैरप्रकार घडल्यास संबंधितांचा शेाध घेण्यास मदत होईल म्हणून भागवत मुळे यांनी प्रवासाअगोदर कंपनीचा नियम म्हणून चौघांचे फोटो काढून ते व्हॉटस्‌ॲपने पत्नीला पाठवले होते. जळगावी गुन्हा घडल्यावर त्याच फोटोवरून आता चौघांचा शोध सुरू झाला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon village coming car and chilly powder on driver eye