निंदनीय..गुन्हाच नव्हे, विकृतीही! 

raver child killed case
raver child killed case

रावेरच्या बोरखेडा रस्त्यावर कालपरवा चौघा चिमुकल्यांच्या हत्याकांडानं संपूर्ण राज्य हादरलं. माणुसकीला काळिमा फासणारं, नृशंस, निर्घृण, राक्षसी, मन सुन्न करणारं... अशा प्रकारची विशेषणं लावून या हत्याकांडाचं वर्णन झालं. मुख्यमंत्र्यांकडून दखल, गृहमंत्र्यांच्या भेटीचे सोपस्कार पार पडले... यात आरोपीही तत्काळ अटक झालेत, त्यांना कठोर शासन होईलही... पण, केवळ या सोपस्कारांनी अशा प्रकारच्या घटना थांबतील का? दुसरं म्हणजे, हाथरससारखं राजकारण या प्रकरणात झालं नाही, हे सुदैवच. अर्थात, केवळ पीडित व आरोपींच्या जातीवरून अशा प्रकारच्या घटनांवर राजकीय पोळी भाजली जात असेल, तर त्याचंही वर्णन ‘पाशवी’ असंच करावं लागेल. 

अत्याचार आणि सामूहिक हत्याकांडांची प्रकरणे अलीकडे तिकडे ‘यूपी’तच नव्हे, तर देशभर वाढलीत. एक हाथरस प्रकरण काय घडलं अन्‌ त्यावरुन झालेल्या राजकारणानंतर अन्य राज्यांतील प्रकरणे ज्या गतीने समोर आलीत, त्यावरून अत्याचाराच्या घटना आणि हत्या ही काही एकाच राज्यातील विकृती नव्हे, तर ती सार्वत्रिक आहे, हे अधोरेखित झाले. कोणत्या राज्यात कुठले सरकार आहे, यावरच अशा प्रकरणांना द्यायची ‘हवा’ ठरते, ही आपल्या राजकीय व सामाजिक व्यवस्थेची शोकांतिकाच. असो.. 
तर रावेरमध्येही शुक्रवारी मूळ मध्य प्रदेशातील कुटुंबातील चौघा चिमुकल्यांच्या हत्याकांडानं खानदेश अन्‌ महाराष्ट्रही हादरला. अशा प्रकारच्या घटनांनंतर जे प्रशासकीय व राजकीय सोपस्कार पार पाडले जातात, ते दोन-चार दिवसांत आटोपत आहेत. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख शनिवारी प्रत्यक्ष येऊन त्या कुटुंबाचे सांत्वन करून गेले. स्थानिक राजकीय नेत्यांच्या व समाजातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक म्हणावे. प्रकरणात आरोपी अटक झाले, त्यांच्यावर खटला चालेल.. प्रसंगी कठोर शिक्षाही होईल. पण, त्यानंतर..? 
त्यानंतर..? हा प्रश्‍न कायम आहे. अशा घटना थांबतील का? हाथरस प्रकरण देशभरात गाजले, हिंदी माध्यमांनी हे प्रकरण अक्षरश: अंगात आणले. त्यावरून राजकीय पोळ्याही भाजल्या गेल्या, अजूनही ‘तवा’ गरम आहेच. रावेरच्या सामूहिक हत्याकांडांतही अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. म्हणजे हाथरसपेक्षाही हे प्रकरण गंभीर. अर्थात, अशा प्रकरणांची परस्पर तुलनाही होऊ शकत नाही, इतके ते पाशवी आहे. देशातील विविध भागांत असे प्रकार सातत्याने घडत आहेत. या केवळ त्या-त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना नाहीत, तर ही समाजातील एक विकृती आहे. ही विकृती जोपर्यंत ठेचली जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. 
यापूर्वीही अनेक ठिकाणी अशा स्वरूपाची हत्याकांडं घडलीत. काही प्रकरणांचा तपास लागून आरोपींना शासन झाले, तर काही प्रकरणे अद्याप उलगडलेलीच नाहीत. जळगाव तालुक्यात चार वर्षांपूर्वी मे २०१६ मध्ये भादली येथे असेच अमानुष हत्याकांड घडले. प्रदीप भोळे, त्याची पत्नी व दोघा चिमुकल्यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाली. चार वर्षांनंतरही या प्रकरणाचा तपास लागू शकलेला नाही. पाच-सात हजार वस्तीच्या गावात एकाच कुटुंबातील चौघांचा खून होतो, तरी संपूर्ण गावातून एकाही व्यक्तीला काही पत्ता लागत नाही, हे न उलघडलेलं कोडंच आहे. 
एक गोष्ट आणखी नमूद केली पाहिजे आणि ती म्हणजे अशा हत्याकांड, अत्याचाराच्या बऱ्याचशा घटनांमध्ये आरोपी म्हणून जवळचा, नात्यातला अथवा मित्रपरिवारातलाच व्यक्ती समोर येतो. म्हणजे, ज्यांच्यावर विश्‍वास ठेवावा, त्यांनीच दगाफटका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच अशा घटनांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा होणे, जसे गरजेचे आहे, तशी समाजातील ही विकृती जाण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचीही गरज आहे. हाथरस प्रकरणारून देशभरात जे जातीचे राजकारण झाले, तेदेखील दुर्दैवीच म्हणावे लागेल. किमान अत्याचार आणि अशा नृशंस हत्याकांडाच्या घटनांवरून आपल्या कथित समाजसुधारकांनी राजकीय पोळी भाजण्याचा पाशवी अत्याचार करणे बंद केले, तरी ही कृत्य करणाऱ्या विकृतीला त्यातून थोडा धडा मिळू शकेल, असे वाटते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com