ऑनलाइन गंडा ः ‘फ्लिपकार्ट कस्टमर केअर’ला चौकशी करणे पडले महागात 

रईस शेख
Monday, 17 August 2020

‘तुम्हाला ११ रुपये चार्जेस लागतील. मी डिलिव्हरी बॉय बदलून देतो’ असे म्हणत मोबीक्विक ॲप्लिकेशनद्वार कोड पाठविला.

जळगाव  : फ्लिपकार्टवरून ऑनलाइन टीव्ही बुक केल्यानंतर त्याची डिलिव्हरी मिळण्यास उशीर झाल्याने गुगलवर फ्लिपकार्ट कस्टमर केअरचा क्रमांक मिळवून त्यावर संपर्क केलेल्या तरुणास ३५ हजारांत गंडा घातला आहे. अशाच एका प्रकारात डॉक्टर महिलेसही सायबर गुन्हेगारांनी फसविले आहे. 

हरिविठ्ठलनगरातील मिलिंद वानखेडे (वय ३५) यांनी फ्लिपकार्टवर २४ हजार ६५० रुपयांचा मोटारेाला कंपनीचा ४३ इंची टीव्ही बुक केला होता. आठ दिवस उलटूनही टीव्हीची डिलिव्हरी मिळाली नाही, म्हणून त्या तरुणाने गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक मिळविला. त्यावर संपर्क केला असता, भामट्याने गोड बोलत, ‘तुम्हाला ११ रुपये चार्जेस लागतील. मी डिलिव्हरी बॉय बदलून देतो’ असे म्हणत मोबीक्विक ॲप्लिकेशनद्वार कोड पाठविला. तो स्कॅन करून बँक खात्याशी कनेक्ट असलेला मोबाईलचा ताबा मिळवून सुरवातीला २४ हजार ६५० व नंतर १२ हजार ६३८ असे ३७ हजार २८८ रुपये खात्यातून काढून घेतले. वानखेडे यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

महिला डॉक्टरलाही १७ हजारांचा गंडा 
दुसऱ्या घटनेत मेहरूण परिसरातील डॉक्टर महिलेची १७ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली. डॉ. सायका फारूख शेख (वय २६, रा. शेरा चौक, मेहरूण) यांनी ७ ऑगस्टला दुपारी साडेचारला मोबाईलवरून डीटीडीसी कुरिअर कंपनीचा ऑनलाइन मेंबरशिप अर्ज भरला. अर्ज पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका नंबरावरून फोन आल्या. ‘तुमची डीटीडीसी कुरिअरची मेंबरशिप पूर्ण झाली असून, मेंबरशिपचा ओटीपी तुमच्या मोबाईलवर पाठविला आहे. तो क्रमांक सांगा,’ असे सांगून डॉ. सायका शेख यांनी चारअंकी ओटीपी क्रमांक दिला. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांना नऊ हजार ९९९ आणि सात हजार रुपये असे एकूण १६ हजार ९९९ रुपये पीपल्स बँकेच्या खात्यातून कट झाले. याबाबत त्यांनी तत्काळ फोन आलेल्या नंबरवर फोन केला असता, कट झालेल्या पैशांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉ. सायका शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

 

संपादन-भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young with female doctor online theft