व्हॉटस्‌ॲपवर भरला लग्नाचा बाजार अन्‌ दुसऱयाच दिवशी नवरी फुर्रर्र ! आणि त्याने केले असे 

रईस शेख
Monday, 7 September 2020

दुसरे लग्न केले त्यात महिला दलालांनी १ लाख रुपये उकळले, मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू मोबाईल चोरुन पळाली. पैसेही गेले, मुलगीही पळाली.

जळगाव ः कुसूंबा (ता.जळगाव) येथील तरुणाच्या आत्महत्येमागचे कारण समोर येत आहे. दलालांनी लाख रुपये उकळून या तरुणाचे लग्न लावून दिले. दुसऱ्याच दिवशी नववधू रफूचक्कर झाली. त्यातून आलेल्या नैराश्‍यामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. 

कुसूंबा येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेला कैलास संतोष चवरे (वय-३०) या तरुणाचे पहिले लग्न मोडून फारकत झाली होती. दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करुनही मुलगी भेटत नाही म्हणून शनिपेठेतील रहिवासी लिलाबाई ऊर्फ भाभी रामनारायण जोशी हिच्या माध्यमातून लग्न करवून देण्याचे ठरले. त्यासाठी १ लाखापर्यंत खर्च येईल, असे सांगून मुलाकडील मंडळींनी होकार दिल्यावर त्याच दिवशी या कुटुंबास एक मुलगी दाखवली गेली. ती पसंतही पडली. मात्र, मुलगीच नाही म्हणत असल्याचे सांगत व्हॉटस्‌ॲपवर दुसरी मुलगी दाखवली, तिलाही होकार दिल्यावर मलकापूर (ता. बुलढाणा) येथे घेऊन जात तेथे कैलास चवरे याचे एका मुलीसोबत लग्न लावून देण्यात आले. लग्नाआधी ४० हजार रेाख व लग्न करुन परतल्यावर ६० हजार असे एक लाख रुपये दोघा महिलांनी चवरे यांच्याकडून उकळले होते. 

..अन्‌ कैलासने घेतले विष 
कैलास निर्व्यसनी, सज्जन तरुण होता. पहिले लग्न यशस्वी झाले नाही. दुसरे लग्न केले त्यात महिला दलालांनी १ लाख रुपये उकळले, मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू मोबाईल चोरुन पळाली. पैसेही गेले, मुलगीही पळाली, म्हणून कैलाससह त्याचे नातेवाईक (३ ऑगस्टला) शनिपेठेतील लिलाबाई ऊर्फ भाभीकडे आले. आमचे पैसे आम्हला परत करा, अशी मागणी केल्यावर भाभीने त्यांना धमकावून पिटाळून लावले होते. भाभीच्या घरून परततांना भिलपुरा चौकीजवळ कैलासने विष घेतले. उचारार्थ दाखल केल्यावर नंतर त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी शनिपेठेत गुन्हा दाखल करण्यात आला. 

दलाल महिला अटकेत 
शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर संशयित लिलाबाई रामनारायण जोशी व पद्मा सुधाकर खिल्लारे ऊर्फ संगीताबाई रोहिदास भालेराव ऊर्फ संगीता पाटील या दोघा महिलांना अटक करण्यात येऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 

राज्यभर टोळ्या कार्यरत 
जळगावसह जिल्ह्यात पैसे घेऊन लग्न लावून देणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत, मुलाकडून लाख, दान लाख ५ लाखापर्यंत उकळून लग्न लावून दिले जाते. लग्नानंतर घरी आलेली नववधू चोरी करुन पोबारा होते. या घटना सततच्या वाढल्या आहेत. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon young man commits suicide by administering poison due to marriage fraud