esakal | सत्ताधाऱ्यांची खेळीत विरोधक अडकले!
sakal

बोलून बातमी शोधा

 Jalgaon Zilla Parishad

सत्ताधाऱ्यांची खेळीत विरोधक अडकले!

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव: सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्‍या विषयांवर आक्षेप मांडून विरोध नोंदविणारे शिवसेना (Shiv Sena), राष्‍ट्रवादी (NCP) व कॉँग्रेसचे (Congress) सदस्‍य गुपचूप बसले होते. विशेष म्‍हणजे मागील सभेत बहिष्‍कार टाकणाऱ्या विरोधकांची नावे सूचक व अनुमोदक म्‍हणून इतिवृत्तात आल्‍याने दोन सदस्‍यांनी मुद्दा मांडला. त्‍यास धोरणात्मक निर्णय असल्‍याचे सांगत आवाज उठविणारे विरोधक शांत होते. जिल्हा परिषदेची ( Jalgaon Zilla Parishad ) सर्वसाधारण सभा अध्‍यक्षा रंजना पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली. मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, उपाध्‍यक्ष लालचंद पाटील, सभापती जयपाल बोदडे, रवींद्र पाटील, उज्ज्‍वला माळके, ज्‍योती पाटील, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे व सदस्‍य उपस्थित होते.

(jalgaon zilla parishad general assembly opposition traps in power game)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;जळगावात १४२ टन ऑक्सिजनची निर्मीती

जि.प.च्‍या इतिहासात प्रथमच असे झाले
सर्वसाधारण सभेत सर्वांत प्रथम इतिवृत्तावर घमासान होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सभेपूर्वी घेतलेल्या सभेमुळे शुक्रवारच्‍या सभेत विरोधकांनी गुपचिळी असल्‍याचे पाहावयास मिळाले. अवघ्या १२ मिनिटांत पटलावरील २२ विषय व आयत्या वेळचे २१ असे ४३ विषय त्यातच इतिवृत्ताला मंजुरी दिल्‍याचे पहिल्यांदाच झाले. मागील ऑनलाइन सभेत विरोधकांनी सभेवर बहिष्कार टाकला होता. प्रश्न सुटत नसल्याने सेनेसह राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेसच्या सदस्यांनी वॉकआउट केला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सभा बहुमतात चालवून विषय मंजूर केले. असे असताना इतिवृत्तात सूचक व अनुमोदक म्हणून सेना व राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या सदस्यांची नावे कशी आली, असा सवाल गोपाळ चौधरी यांनी सभेच्‍या सुरवातीलाच करत आमचे गटनेते मॅनेज झाले का, असा टोला त्यांनी लगावला. त्यावर शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील यांनी सभेत धोरणात्मक विषय असल्याने सूचक व अनुमोदक म्हणून नावे आली. प्रशासनाला सहकार्य म्हणून केल्याची त्यांनी सांगितले. यावर नीलम पाटील यांनी सूचक म्हणून आपले नाव काढावे, अशी मागणी केल्यावर राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे हतबल झाले.

तुम्ही ठरवा, आम्ही सभा चालवू
गोपाळ चौधरी यांनी भाजप व सेनेच्या सदस्यांवर मॅनेजचे आरोप केल्यानंतर भाजपचे नंदकिशोर महाजन यांनी आरोप फेटाळून लावले. तुमचेच सदस्य बहिष्कार टाकून गेले होते. तेच विनवण्या करण्यासाठी आले होते. आम्ही बहुमतामध्ये सभा घेतली होती. सभा चालू न देण्याचा प्रकार विरोधकांकडूनच झाला होता. तुम्ही ठरावा आजही बहिष्कार सभेवर टाकला, तरी आम्ही सभा चालवू, असे सांगितल्यावर राष्ट्रवादी व सेनेच्या सदस्यांचे चेहरे पडले.

हेही वाचा: मार्केट यार्ड बंदने १५ कोटींची उलाढाल ठप्प

विभागात समन्‍वय नाही
प्रत्येक विभागात समन्वय नसल्याने त्यांना उत्तरे देता येत नाहीत. मात्र, जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन व अतिरिक्त सीईओ कमलाकर रणदिवे त्यांची उत्तरे देऊन वेळ मारून नेत होते. मात्र, सर्वसाधारण सभेत झालेल्‍या ठरावावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केला. या विषयाचा धागा पकडून नानाभाऊ महाजन, नंदकिशोर महाजन, अमित देशमुख, मधुकर काटे आदींनी हा मुद्दा उचलून धरला.

हेही वाचा: चोपडा तालुक्यातील सातपुडा डोंगरामध्ये प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात

शिक्षण विभागातील बदल्यांमध्ये घोळ
प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षक बदल्यांमध्ये घोळ झाला असून, शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे यांची चौकशी करून त्यांना शिक्षणाधिकारीपदावरून कार्यमुक्त करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर अतिरिक्त सीईओ कमलाकर रणदिवे यांनी ३१ जुलैनंतर त्यांच्याकडून पदभार काढून कार्यमुक्त करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

loading image