अजिंठा लेणी खुली; पर्यटनासाठी जायचेय तर आधी करा बुकिंग

सतीश बिऱ्हाडे
Thursday, 10 December 2020

अजिंठा लेणी दोनशे वर्षात पहिल्यांदाच जवळजवळ 9 महिने बंद होती. कोरोनाच्या लॉकडाउननंतर आता लेणी पर्यटनासाठी सुरू होणार असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये देखील आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे.

तोंडापूर (ता. जामनेर) : कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल 9 महिन्यानंतर उघडण्यात आली. पर्यटनस्थळांची साफसफाई, स्वच्छता करून आजपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली. पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेण्याची संधी आता खुली झाली असून पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार नाही. याकरीता आधी www.asi.nic या संकेतस्थळावर आॕनलाईन तिकिट उपलब्ध होणार आहे.

नक्‍की वाचा- कुत्र्यांच्या आवाजाने दरवाजा उघडला, आणि समोरचे दृश्य पाहून थरकाप उडाला ! 

अजिंठा लेणी दोनशे वर्षात पहिल्यांदाच जवळजवळ 9 महिने बंद होती. कोरोनाच्या लॉकडाउननंतर आता लेणी पर्यटनासाठी सुरू होणार असल्यामुळे व्यावसायिकांमध्ये देखील आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. याकरीता सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दिवसभरात दोन हजार पर्यटकांची भेट
लेणी पाहण्यासाठी सकाळच्या सत्रात एक हजार आणि दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटक भेट देवू शकतील. अजिंठा लेणी येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे परिसरातील 40 ते 50 हॉटेल्स, 15 ते 20 डोलीवाहक, टी पाँईन्टवरील 40 ते 45 दुकाने आणि इतर लहान- मोठ्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या 400 ते 500 कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती.

झाला शुभारंभ
ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते अजिंठा लेणी सुरू करण्यासाठी उद्धघाटन झाले. यावेळी तहसिलदार प्रवीण पांडे, जि. प. सदस्य गोपीचंद जाधव, अजिंठा लेणी उपाध्यक्ष विलास वराडे, कार्याध्यक्ष विठ्ठल आगळे, माजी अध्यक्ष पपिंद्रपाल सिंग, आबा काळे आदी उपस्थित होते. तसेच उपसरपंच शेख मुन्शी, सभापती रस्तूल बी. उस्मान खान, रघुनाथ चव्हाण, तहसीलदार प्रवीण पांडे, गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे क्षीरसागर, भारतीय पुरातत्व विभागाचे शेख कलिमोद्दीन, राधेश्याम जाधव आदींचीही उपस्थिती होती. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner ajanta caves open but turist online ticket booking