Video : आघाडी सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : माजीमंत्री महाजन 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात अजुनही मका- कपाशी हे विक्रीअभावी पडलेले आहेत. शासन खरेदी करीत नाही, इतर धान्याची देखील तिच अवस्था आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व माल राज्य सरकारने लवकरात लवकर खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा.

जामनेर : सत्तेवर येण्यापुर्वी फक्त शेतकरी हिताच्याच गोष्टी महाविकास आघाडीकडून केल्या जात होत्या. परंतु सत्तेत आल्यानंतर या हिताच्या गोष्टी केवळ नावापुरत्या राहिल्या असून महाविकास आघाडी सरकारने आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला. 

जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज जामनेरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी महाजन मोर्चासमोर बोलत होते. शहर नगरपालिके समोरील राजमाता जिजाऊ चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चातील कार्यकर्त्यांनी राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परीसर दणाणुन गेला होता. माजीमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये पंचायत समितीच्या सभापती सुनंदा पाटील, बाजार समिती सभापती संजय देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष व शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर आदी सहभागी झाले होते. 

कर्ज तात्काळ द्या 
महाजन म्हणाले, की शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात अजुनही मका- कपाशी हे विक्रीअभावी पडलेले आहेत. शासन खरेदी करीत नाही, इतर धान्याची देखील तिच अवस्था आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व माल राज्य सरकारने लवकरात लवकर खरेदी करून त्यांना दिलासा द्यावा. कर्ज विनाअट व तात्काळ शेतकऱ्यांना मिळावे; अशी मागणी त्यांनी केली. कपाशी, मक्‍याची खेरदी यापुढे अविरतपणे सुरू झाली नाही; तर मोर्चाचे आणखी विशाल स्वरूपात जिल्हास्तरावर आयोजन करण्याचा इशाराही महाजन यांनी दिला. 

मंत्री मात्र राजकारणात मश्‍गुल 
राज्यात एकीकडे कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून सरकारमधील मंत्री फक्त राजकारणात मश्‍गुल आहेत. रोज नवनवी आकडेवारी जाहिर करण्यात धन्यता मानतात. एकंदरीत हा जनतेच्या आरोग्याशी खेळ चालल्याचा आरोप आमदार महाजन यांनी यावेळी केला. कोरोना रूग्णांची होणारी हेडसांड आजपर्यंत थांबलेली नाही. मोर्चातर्फे देण्यात आलेले निवेदन तहसीलदार अरूण शेवाळे यांनी स्विकारले. यावेळी पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे आदी अधिकारी-कर्मचारी होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner bjp girish mahajan strike goverment farmer cotton and corn