भाजपच्या नगरसेविका दहा महिन्यांपासून गायब ?  

सुरेश महाजन
Friday, 13 November 2020

नगरसेविका या मूळ जामनेरच्या रहिवासी नसून, त्या भडगाव तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून जामनेर येथे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य आहे.

जामनेर : नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका ज्योती धोंडू पाटील या निवडणूक जिंकल्यानंतर केवळ महिनाभर प्रभागात दिसल्या, त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून त्या बेपत्ता असून, अद्याप त्यांचा शहरात व प्रभागात पत्ता नाही. प्रभागांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या असून, अशा निष्क्रिय व बेजबाबदार नगरसेविकेला त्वरित अपात्र करावे, अशी मागणी जामनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष दीपक राजपूत यांनी केली आहे. 

आवश्य वाचा- जळगाव असो वा बिहार, कॉँग्रेसचा ‘आव’ जास्त अन् ‘जोर’ कमीच! 

 

युवक काँग्रेसतर्फे मुख्याधिकारी राहुल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जामनेरपुरा, शास्त्रीनगर, इंदिरा आवास, स्वामी विवेकानंदनगर या प्रभागातील नगरसेविका ज्योती पाटील शास्त्रीनगरमधील रहिवासी आहेत. परंतु गेल्या दहा महिन्यांपासून त्या व त्यांचे पती आपल्या निवासस्थानी नाहीत. निवडून आल्यापासून फक्त महिनाभर त्या शहरामध्ये वास्तव्यास होत्या. त्यानंतर त्या गायब झाल्या आहेत. नगरसेविका या मूळ जामनेरच्या रहिवासी नसून, त्या भडगाव तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून जामनेर येथे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे वास्तव्य आहे. त्यांचे पती धोंडू पाटील हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. नगरपालिका निवडणुकीत ज्योती पाटील यांनी निवडून येण्यासाठी अनेक आश्वासनांचा भडीमार केला होता. प्रत्यक्षात मात्र एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.

नागरीक त्रस्त 

प्रभागातील मतदारांची त्यांनी मोठी फसवणूक केली आहे. प्रभागातील जनतेला वाऱ्यावर सोडून अत्यंत बेजबाबदारपणे त्या इथून निघून गेल्याचे दिसत असून, प्रभागात अनेक समस्या निर्माण झाल्या असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बेजबाबदार नगरसेविकेला त्वरित बरखास्त करावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक राजपूत, सचिन बोरसे, गणेश कुवर, प्रतिभा गायकवाड, विशाल गायकवाड, दीपक महाराज, प्रदीप कल्याणकर, भैय्या शिंदे, अजय सोनवणे, तुषार भोलाने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner congress demanded that the BJP's civil servants from Jamnera should not be seen in the ward