crime
crime

हृदयद्रावक... शुल्‍लक कारण पण वडील व लहान भावावर केले सपासप वार

पहूर (ता. जामनेर) ः पहूर पोलीस ठाण्यांतर्गत पहूर येथून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावरील नांद्रा प्र . लो . येथे जन्मदात्या बापाची व लहान भावाची पोटच्या मुलाने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व सहकाऱ्यांनी आरोपीस अटक केली.


जामनेर तालुक्यातील नांद्रा या लहानशा गावात मजुरी करून गुजराण करणाऱ्या कुटुंबात मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली. नांद्रा प्र .लो . येथील रहिवाशी निलेश आनंदा पाटील हा पुणे येथे रोजंदारीवर काम करीत होता. मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम धंदा बंद झाल्याने तो गावी आला होता. तर त्याचा लहान भाऊ महेंद्र पाटील हा जळगाव येथे एका खासगी चटई कंपनीत कामाला होता. तसेच गेल्या सहा महिन्यापूर्वी तो पत्नी अश्विनीसह कुसुंबे येथे राहत होता. दरम्यान जळगाव येथे आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू झाल्याने काम बंद असल्याने महेंद्र आपल्या गावी आई– वडिलांच्या भेटीसाठी पत्नीसह आला होता. निलेश हा शेजाऱ्यांशी भांडत असताना भाऊ महेंद्र आणि वडील आनंदा पाटील यांनी निलेशला का भांडतो? याबाबत विचारत चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत घरी आणून भांडण मिटविले. परंतु निलेशच्या मनात याबद्दल प्रचंड राग उफाळून आला होता. याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती.

अन घडला थरार ....
रात्रीचे अकरा वाजले...आई- वडील बाहेर झोपलेले असताना निलेशने घरातील धारदार चाकूने वडीलांवर वार केले. वडिलांचा आक्रोश ऐकून महेंद्र आणि त्याची पत्नी अश्विनी निलेशला बाजूला करण्यासाठी धावले. संतप्त झालेल्या निलेशने लहान भावावरही चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले. मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य पाहून आपल्या जिवाच्या आकांताने अश्विनी बाहेर पडाली म्हणून तीचा जिव वाचला. 
या घटनेची वार्ता कळताच गावातील लोक जमा झाले. नांद्रा प्र.लो.चे पोलिस पाटील दिनेश रामा कुहाडे यांनी पहूर पोलीसांना घटनेचम माहिती दिली. पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून आरोपी निलेश आनंदा पाटील यास ताब्यात घेतले. याप्रकरणी अश्विनी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल -
जळगाव मोबाईल फॉरेन्सिक विभागाचे विकास वाघ, हरीश परदेशी, दीपक चौधरी यांच्या पथकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी आज सकाळी नांद्रा येथे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला. दरम्यान, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी पहूर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली घेत आरोपीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगीतले.

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com