मेहुणबारेत आढळला कोरोनाचा रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

धुळ्यात व्यवसायानिमित्ताने राहणाऱ्या ४७ वर्षीय प्रौढाला कावीळचा आजार होता. उपचारासाठी तो नुकताच नाशिक येथे जाऊन आल्यानंतर धुळ्याला गेलेला होता. तेथून तीन- चार दिवसांपूर्वी मेहूणबारेत नातलगांना भेटण्यासह कावीळचे औषध घेण्यासाठी आलेला होता. या काळात त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो पुन्हा धुळ्यात गेला.

मेहूणबारे (ता. चाळीसगाव) : येथील रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय प्रौढाला धुळे येथे कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे. संबंधित रुग्ण हा नुकताच मेहुणबारे येथे आपल्या गावी राहत असलेल्या भावासह नातेवाइकांकडे येऊन गेला होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या १२ जणांना चाळीसगाव येथील कोविड सेंटरमध्ये तर ९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. या सर्वांचे स्वॅब घेऊन ते जळगावला तपासणीसाठी पाठवले आहेत. दरम्यान, आतापर्यंत तालुक्यात कोरोनाचे १९ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १३ जण उपचार करून घरी परतले आहेत.
येथील रहिवासी असलेला व सध्या धुळ्यात व्यवसायानिमित्ताने राहणाऱ्या ४७ वर्षीय प्रौढाला कावीळचा आजार होता. उपचारासाठी तो नुकताच नाशिक येथे जाऊन आल्यानंतर धुळ्याला गेलेला होता. तेथून तीन- चार दिवसांपूर्वी मेहूणबारेत नातलगांना भेटण्यासह कावीळचे औषध घेण्यासाठी आलेला होता. या काळात त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो पुन्हा धुळ्यात गेला. धुळ्यात त्याची तपासणी केली असता, त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या मेहूणबारे येथील नऊ नातेवाइकांना होम क्वांरटाईन करण्यात आले आहे. ज्यात ४ महिला व ५ मुलांचा समावेश आहे. तर १२ जणांना चाळीसगावच्या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेऊन जळगावला पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मेहुणबाऱ्यात खळबळ
कोरोनाबाधित रुग्ण मेहुणबारेत येऊन गेल्याचे समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती समजताच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. पी. बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे, तहसीलदार अमोल मोरे, तलाठी श्री. चव्हाण, लोंढे उपकेंद्राचे डॉ. संदीप निकम, डॉ. स्वप्निल निकम, डॉ. किशोर चव्हाण, डॉ. विलास सोनार यांच्यासोबत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्ण राहणाऱ्या परिसरात भेट देऊन पाहणी केली. संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला असून ‘सील’ करून कन्टेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. शहरासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाची शिरकाव झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. यापूर्वी सायगाव व जामडी गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते.

‘फिजीकल डिस्टेन्सिंग’चा फज्जा
गावात दर शुक्रवारी भरणाऱ्या बाजारात मोठी गर्दी होते. कालच्या बाजारात लोणच्याच्या कैऱ्या विकत घेण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे पाय ठेवायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी झाली होती. पोलिसांनी दिवसभरात अनेकदा येऊन भाजीपाला विक्रेत्यांना ‘फिजीकल डिस्टेन्सिंग’चे पालन करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कोणीही त्याचे पालन केले नाही. बाजारात कोरोना रुग्णाचा शिरकाव झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असतानाही ग्रामस्थांकडूनच नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीसही हतबल झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare first corona positive case