ट्रकमध्ये तब्बल 39 जनावरे कोंबून घेऊन जात होते, मात्र...

दिपक कच्छाव
Saturday, 1 August 2020

ट्रक अडवला ट्रकच्या चालक व क्लीनर यांना ट्रकमध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीसांनी त्या  ट्रकची ताडपत्री उचकावून पाहीली तर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे कोंबलेल्या अवस्थेत दिसले.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव): ट्रकमधून तब्बल 39 पारडू निर्यदीपणे कोंबून त्यांची वाहतुक करणारा ट्रक मेहूणबारे पोलीसांनी गस्तीदरम्यान पकडला व त्या पारडूंची सुटका केली. पोलीसांनी 4 लाख रूपये किंमतीचे पारडू व ट्रक असा सुमारे 8 लाख 90 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला असून  जनावरांची निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून अवैधपणे वाहतुक करणाऱ्या हरीयाणा व उत्तरप्रदेशातील दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात मेहूणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

या घटनेची माहिती अशी की, मेहूबणारे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत शिंदे,  प्रतापसिंग मथूरे, राजेंद्र निकम, होमगार्ड ऋषिकेश झोडगे, सागर साळुंखे, महेंद्र पवार आदींचे पथक काल (ता.31) जुलै रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रस्त्यावर तरवाडेबारी चेक पोस्टवर नाकाबंदी करीत असतांना धुळ्याकडून चाळीसगावच्या दिशेने येत असलेला (आरजे.14 जेजे.0388) या ट्रकला पथकाने थांबवण्याचा इशारा दिला असता त्याने थांबवला नाही. 

पोलिसांनी केला पाठलाग

मेहुणबारे पोलीसांनी दुचाकीवरून  त्या ट्रकचा पाठलाग केला व जवळच्या चिंचगव्हाण फाटा येथे हा ट्रक अडवला. ट्रकच्या चालक व क्लीनर यांना ट्रकमध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलीसांनी त्या  ट्रकची ताडपत्री उचकावून पाहीली तर ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरे कोंबलेल्या अवस्थेत दिसले.या जनावरांची मोजणी केली असता सुमारे 3 लाख 90 हजार रूपये किंमतीचे 39 पारडू मिळून आले.

पारडुंची सुटका 

पारडु घेऊन जाणऱया ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबलेले होते. या पारडुंची पोलिसांनी सुटका केली. पोलीसांनी ट्रकसह दोघा आरोपींना ताब्यात घेतले असून तस्लीम ममरेज (28 ) रा. हाऊस नंबर 673, जामा मशिद जवळ,तेड मेवात, हरीयाणा व अहसान कुरेशी(22) रा.कोठा, बागपत, उत्तरप्रदेश अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस नाईक प्रतापसिंग मथूरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वीही मालेगाव रस्त्यावरील साकुर फाटा चेक पोस्टवर गस्ती दरम्यान ट्रकमधून निर्दयतेने वाहतुक करणारा ट्रक पकडून 20 जणावरांची सुटका गस्तीवरील पथकाने केली होती.

 

 संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare Illegal transportation by truck was carrying 39 animals