लग्नघरी दुःखाची छाया; लग्नाची पत्रिका वाटणाऱ्या मामाचा अपघातात मृत्यू 

दिपक कच्छवा
Wednesday, 16 December 2020

मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विजय यांच्या डोक्यास मार लागला, तर मावसा विलास निकम हे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले.

मेहुणबारे : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या भाचीच्या लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जात असलेल्या मामाचा मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला, तर मावसा गंभीर जखमी झाला. चाळीसगाव- धुळे रस्त्यावर भोरस गायरानजवळ हा अपघात झाला. त्यामुळे लग्नघरी दुःखाची छाया पसरली आहे. 

आवश्य वाचा- पतीची आत्‍महत्‍या नव्‍हे घातपात; आरोप करत पत्‍नीचा मुलासह आत्‍मदहनाचा इशारा

विजय रघुनाथ केदार (वय ३२, रा. लहान खेडगाव, ता. भडगाव) यांच्या भाचीचे बुधवारी (ता. १६) लग्न आहे. त्यासाठी श्री. केदार व मावसा विलास निकम (रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) हे दुचाकीने (एमएच ०३, बीडी २६३०) नायडोंगरी, हिरापूर परिसरात नातेवाइकांना पत्रिका देण्यासाठी गेले होते. तेथून चाळीसगावकडून मेहुणबारेकडे येताना भोरस गायरानजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या महिंद्र पिक-अप (एमएच १९, बीएम ४३०१) या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विजय यांच्या डोक्यास मार लागला, तर मावसा विलास निकम हे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले.

 

अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी विजय केदार यांना तपासून मृत घोषित केले, तर विलास यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
दरम्यान, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, पिक-अपचालक मात्र वाहन सोडून पळून गेला. याप्रकरणी राजेंद्र केदार यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

वाचा- सात महिन्यानंतर सिव्हील ओपीडीचे दार खुले; कोरोनामुळे सेवा होती बंद

विवाहावर दु:खाचा डोंगर 
लाडक्या भाचीचे लग्न असल्याने मामा मोठ्या आनंदाने विवाह सोहळ्याचे निमंत्रणपत्रिका नातेवाइकांना वाटत होते. मात्र, ही पत्रिका वाटण्यास जात असतानाच दुचाकीला पिक-अपने पाठीमागून धडक दिल्याने मामाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे लग्नसोहळ्यावर दुःखाची छाया पसरली.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mehunbare unkal death aciddent while distributing wedding magazines