शरद पवारांमुळे माझे राजकीय पुनर्वसन झाले- खडसे  

दिपक चौधरी
Tuesday, 27 October 2020

राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो अन्‌ मंत्रीही झालो असतो.

मुक्‍ताईनगर (जि. जळगाव): भारतीय जनता पक्षात माझ्यावर खूप अन्याय सुरू होता. भाजपविषयी माझ्या मनात नितांत आदर आहे. परंतु, पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्तींनी माझ्यावर अन्याय केला. फडणवीस यांनी मला त्रास दिला, ही माझी भावना आहे. भाजपतच राहिलो असतो, तर मी राजकीय विजनवासात गेलो असतो. अडवानी, अटलजींच्या बाबतीत जे झाले, तेच माझ्या बाबतीत झाले असते, म्हणून मी पक्षांतराचा निर्णय घेतला. शरद पवार यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन माझे राजकीय पुनर्वसन केले असून, मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

आवश्य वाचा-  दोन वर्षाची बालीका तिसऱ्या मजल्यावरून पडली, दैव बलवत्तर म्हणून वाचली !

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री. खडसे त्यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाउसवर दाखल झाले. त्याठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. फार्महाउसवर येण्यापूर्वी खडसे त्यांच्या कोथळी येथे गेले. तेथे भाजप खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचे औक्षण केले. कोथळी येथून फार्महाउसवर आल्यानंतर खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

चार वर्षे अन्याय सहन केला 
खडसे म्‍हणाले, की दसरा हा आनंदाचा सण आहे. या मुहूर्तावर आपण भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झालो. भाजपत आपल्याला अपमानाची वागणूक मिळाली. तेव्हा कार्यकर्ते चिडायचे, संताप व्यक्त करायचे. गेली चार वर्षे मी हा अन्याय सहन केला. माझे मंत्रिपद का काढले? हे आजही अनुत्तरित आहे. मला बाजूला सारल्याने मतदारसंघाचा विकास थांबला. 

भाजपच्याच काही जणांच्या विरोधात काम 
विधानसभा निवडणुकीच्या काळात मला तिकीट नाकारून कन्या रोहिणीला तिकीट दिले. मात्र, भाजपच्या काही लोकांनी रोहिणीच्या विरोधात काम करून त्यांना पराभूत केले. याचे पुरावे मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले होते. तरीही कुणावरही पक्षाकडून कारवाई झाली नाही. रोहिणी खडसे यांच्या विरोधात काम करणाऱ्या भाजपच्या लोकांचे फोटो, व्हिडिओ मी दिले होते. या साऱ्या घडामोडींमुळे अनेक कार्यकर्ते नाराज होते. भाजपतील काहींनी रोहिणी आणि माझ्यात भांडण लावले. त्यानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षांतर का करत नाही? म्हणून माझ्यावर कार्यकर्त्यांचा दबाव होता. याच दबावातून मी पक्षांतर केले आहे, असे श्री. खडसे यांनी सांगितले. 

...तर आता मंत्री राहिलो असतो 
विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट नाकारले; तेव्हा राष्ट्रवादीने माझ्यासाठी एबी फॉर्म आणला होता. तेव्हाच जर का मी राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून उभा राहिलो असतो, तर मी निवडून आलो असतो अन्‌ मंत्रीही झालो असतो. त्याचदिवशी राष्ट्रवादीकडून उभा राहिलो असतो, तर राजकारणाचे चित्र वेगळे राहिले असते. 

आवर्जून वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !  

...अन्‌ रोहिणी खडसेंनी समारंभ सोडला 
राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रथमच मुक्ताईनगरात आलेले श्री. खडसे यांच्या आगमनाच्या जल्लोषानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नेमक्या सत्कार सोहळ्याच्या वेळेस अपघात झाल्याचे समजताच श्री. खडसे यांच्या वाहनांचा ताफा थांबला. तेथून त्यांनी ॲड. रोहिणी खडसे यांना अपघातग्रस्ताची विचारपूस करण्यासाठी पाठवले अन् परिस्थिती लक्षात घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना जळगाव येथे उपचारार्थ हलविण्याची सूचना दिल्या. ॲड. रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी असलेला सत्कार समारंभ तहकूब करण्यात आला. श्री. खडसे यांनी त्यांच्यातील सर्वसामान्यांचा ‘नाथाभाऊ’ची प्रचीती मुक्ताईनगरवासीयांना पुन्हा दिली. 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar political career was over but Sharad Pawar led to political rehabilitation