रान आळूने शरीरास फायदेच फायदे; बहरतेय नगरदेवळ्यात शेती

शैलेंद्र बिरारी
Thursday, 5 November 2020

रान आळूमध्ये (अरवी) सोडिअमची मात्रा असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते.

नगरदेवळा (जळगाव) : पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीकडे तरुणाईचा कल दिसत असून, येथील योगेश परदेशी हे गेल्या तीन वर्षांपासून रान आळू (आरवी) या कंदवर्गीय पिकाची लागवड करीत आहे. 

हेपण वाचा- अवैध गौण खनिज प्रकरण; जि. प.कडून मागविली पाच वर्षांची माहिती 

मध्यप्रदेशातील खंडवा येथून परदेशी यांनी सुरुवातीला बियाणे आणले. एक एकर क्षेत्रात गादी वाफ्यावर लागवड केली. आठ क्विंटल बियाणे आणून लागवड केली. साधारण पाच महिन्यात पीक परिपक्व झाले. काही शेतकऱ्यांना बियाणे तर उर्वरित मध्यप्रदेशात वाशी येथे विक्री केली. एकंदरीत एका एकरातून दहा टन उत्पादन झाले; तर एक लाख तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. पुन्हा तीन एकरात लागवड केली असून, दोन एकरातील पीक परिपक्व झाले तर एक एकर परिपक्व होत आहे. पीक परिपक्व झाले की बाजार भावानुसार त्याची काढणी केली जाते. काही महिने जमिनीत राहिले तरी चालते. मात्र, पीक काढले की त्याची विक्री करणे आवश्यक असते. 

परिसरात प्रथमच प्रयोग 
नगरदेवळा परिसरात प्रथमच हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने अनेक शेतकरी याकडे वळतील. अरवी, अरबी, रान आळूचे गड्डे अशा विविध नावाने ओळखले जाते. वैज्ञानिक नाव कोलोकैसिया एक्सुलेन्टा आहे. 

रान आळूचे फायदे 
रान आळूमध्ये (अरवी) सोडिअमची मात्रा असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. त्याच बरोबर रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह, दृष्टी आदी विकारावर उपयुक्त असून, पचन क्षमता सुधारण्यास मदत होते. कार्बोहाड्रेड, फायबर, पोटॅशिअम त्यात असून, जीवनसत्त्व एक, सी, इ, बी ६ असल्याने शरीरास उपयोगी आहे. तर ताणतणाव दूर होण्यास हातभार लागतो. 

यांनी खाणे टाळावे
शरीरास जेवढे उपयोगी असले तरी कच्चे रान आळू (अरवी) खाल्ल्याने घशात जळजळ होते. वातविकार, अस्थमा, सांधेदुखी, वात विकार, गॅसेस आदी विकार असणाऱ्या व प्रसूत झालेल्या महिलांनी हे खाणे टाळावे. त्याची पाने देखील त्रासदायक आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nagardevla farming arvi aalu last three year