बहुळा धरणातून पहिले आवर्तन सुटले; रब्‍बीसाठी लाभ

राजेंद्र पाटील
Friday, 11 December 2020

सलग दुसऱ्या वर्षी भरलेल्या कृष्णा सागर जलाशयातून शेतकऱ्यांना रब्बीसाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे.

नांद्रा (ता.पाचोरा, जळगाव) : पाचोरा तालुक्याला संजिवनी ठरलेल्या बहुळा धरण (कृष्णा सागर जलाशय) सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्‍के भरल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लंवीत झाल्या आहेत. यात आज (11 डिसेंबर) सकाळी अकराला पहिले आवर्तन सोडण्यात आले.
पाचोरा- भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पुजन करुन पहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी युवानेते सुमित पाटील, जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, माजी जि.प.सदस्य उद्धव मराठे, शिवसेना तालुका प्रमुख शरद पाटील, माजी सभापती पढरीनाथ पाटील, जि.प. सदस्य संजय पाटील आदी उपस्‍थित होते. सहाय्यक अभियंता आर. एस. मोरे यांनी रब्बीच्या आवर्तना बाबतीत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज भरून आवर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आणखी दोन आवर्तन सोडणार
सलग दुसऱ्या वर्षी भरलेल्या कृष्णा सागर जलाशयातून शेतकऱ्यांना रब्बीसाठी तीन आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनाचा लाभ खेडगाव, वेरुळी, हडसन, पहाण, लासगाव, सामनेर, माहिजी, वरसाडे, परधाडे येथील शेतकऱ्यांना होणार असल्याचे सहाय्यक अभियंता मोरे यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora first rotation skipped bahula dam