पाचोरा बाजार समिती बरखास्त 

pachora Market Committee
pachora Market Committee

पाचोरा (जळगाव) : पाचोरा व भडगाव या दोन्ही तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेल्या पाचोरा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने तसेच शासनाकडून संचालक मंडळास मुदतवाढ देण्यात न आल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले. शासनातर्फे प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नामदेव सूर्यवंशी यांनी सोमवारी (ता. २१) बाजार समितीचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रशासक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत सचिव बी. बी. बोरुडे यांना निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 

गेल्या १८ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्याच्या कारणावरून महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ चे कलम १५/१ अ अन्वये संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश जिल्हा सहकार निबंधकांनी काढले असून, प्रशासक म्हणून नामदेव सुर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. प्रशासकांनी आज पदभार स्वीकारला. दरम्यानच्या पाच वर्षांच्या काळात परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोप, गतकाळातील ज्यादा खर्चाचा विषय, जागा विक्री, जे सदस्य ज्या मतदारसंघातून निवडून आले, तेथे त्यांचे सदस्यत्व गेल्याने ७ संचालक अपात्र ठरले होते. त्यात प्रताप पाटील, मंगेश पाटील, विकास पाटील, उद्धव मराठे, पंढरी पाटील, वसंत वाघ, नानासाहेब देशमुख यांचा समावेश होता. हे प्रकरण जिल्हा सहकार निबंधक, विभागीय आयुक्त, सहकार मंत्री व खंडपीठापर्यंत गेल्याने बाजार समिती सतत चर्चेच्या झोतात राहत आली होती. 

भाजपची होती सत्ता 
सध्या बाजार समितीत भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. भाजपाचे सतीश शिंदे सभापती, तर राष्ट्रवादीचे ॲड. विश्वासराव भोसले उपसभापती होते. संचालक मंडळात अॅड. दिनकर देवरे, नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, सिंधू शिंदे, सुनंदा बोरसे, दत्तात्रय पाटील, संजय सिसोदिया, गनी शाह यांचा समावेश होता. विशेष आमंत्रित संचालक म्हणून सदाशिव पाटील व बन्सीलाल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजीनामा दिलेले व मृत संचालक यांच्या जागी धोंडू हटकर, प्रिया संघवी, रेखा मोर यांची वर्णी लागली होती. गेल्या वर्षभरापासून आर्थिक विवंचनेत असलेली बाजार समिती आर्थिक प्रगतीकडे झेपावत असताना संचालक मंडळाची मुदत संपल्याने शासनाच्या आदेशानुसार संचालक मंडळ बरखास्त होऊन आता प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. 

२०१५ नंतर असे होते चित्र
पाचोरा-भडगाव बाजार समितीची १७ जागांसाठीची संचालक मंडळाची निवडणूक सप्टेंबर २०१५ मध्ये घेण्यात आली होती. त्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीत चांगलीच लढत झाली होती. त्यात शिवसेनेने ९ जागा मिळवून बहुमत मिळवले होते. प्रथम सभापतीचा मान सेनेचे ॲड. दिनकर देवरे यांना, तर उपसभापतीचा मान विश्वास पाटील यांना देण्यात आला होता. त्यानंतर शिवसेनेचे मंगेश राजपूत सभापती व संजय सिसोदिया उपसभापती झाले. तिसरे सभापती म्हणून शिवसेनेचे उद्धव मराठे सभापती व विश्वास पाटील उपसभापती झाले होते. सध्या भाजपाचे सतीश शिंदे हे सभापती, तर राष्ट्रवादीचे ॲड. विश्वासराव भोसले उपसभापती म्हणून पदावर होते. 

प्रशासक मंडळाची बैठक 
सहकार निबंधक सहकारी संस्था नामदेव सूर्यवंशी यांनी आज दुपारी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासक मंडळातील दीपक पाटील, सरदार पाटील, भागवत पाटील, हरिदास पाटील यांनी बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कामकाजासंदर्भातील उपयुक्त टिप्सही दिल्या. 

सचिव बोरुडे निलंबित 
बाजार समितीचे सचिव बी. बी. बोरुडे यांना प्रशासक पदभार घेणार असल्याने उपस्थित राहण्याचे पत्रान्वये कळविण्यात आले होते .असे असताना आदेश न जुमानता ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे प्रशासक मंडळाच्या बैठकीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव मांडून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बोरुडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासक नामदेव सूर्यवंशी यांनी सांगितले.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com