esakal | तर आमदारकीसह मंत्रीपदाचा राजीनामा देणार; गुलाबराव पाटलांचे महाजनांना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

gulabrao patil girish mahajan

आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे;

तर आमदारकीसह मंत्रीपदाचा राजीनामा देणार; गुलाबराव पाटलांचे महाजनांना आव्हान

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरी

पाचोरा (जळगाव) : गतकाळात सत्तेवर असताना पाच वर्ष राज्यभर दोन- दोन लाख लोकांची आरोग्य शिबिरे घेतल्याचा आव आणणारे व आरोग्यदूत म्हणून मिरवणारे गिरीश महाजन कोरोना सारख्या महामारीत आपल्या रुग्णवाहिकांसह कुठे गायब झाले? त्यांनी आपल्या काळात असलेले जिल्हा रुग्णालय आता पहावे; त्यात अमुलाग्र बदल झालेला त्यांनी मान्य न केल्यास आमदारकीसह मंत्रिपदाचा राजीनामा देईन; असे खुले आव्हान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाचोरा येथील कार्यक्रमात केले.
पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने कृषी महामंडळाच्या खत कारखान्याचे विस्तारित बांधकाम व यंत्रसामुग्री कामाचे भूमिपूजन व विस्तारित शिवतीर्थ मैदानाचे लोकार्पण, कोनशिला अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खत कारखान्यातील कामाच्या भूमिपूजनानंतर शिवतीर्थच्या प्रांगणात जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंह पाटील, दीपकसिंह राजपूत, उद्धव मराठे, अरुण पाटील, रमेश बाफना, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, गणेश पाटील आदी उपस्थित होते. 

रूग्‍णालयातील बदल पहा
जिल्हा रुग्णालयाच्या विषयावर बोलताना ते म्‍हणाले, की आरोग्यदूत महाजन यांच्या काळात असलेला दवाखाना आज पहा. त्यात अमुलाग्र बदल झाला आहे; ते महाजनांनी पहावे. या रुग्णालयात महाजनांच्या काळात असणारे सात वेंटिलेटर आता शंभर झाले आहेत. साडेचारशे ऑक्सीजन बेड असून महिलांसाठी शंभर बेडचे स्वतंत्र दालन होत असून बाल रूग्णांसाठी ३० कोटींच्या निधीतून कामे होत आहेत. 

आमचे सरकार पाडूनच दाखवा
लोकहिताची कामे मोठ्या गतीने होत असताना विरोधक सरकारवर टीका करून सरकार पाडण्याची भाषा करतात. त्यांनी सरकार पाडूनच दाखवावे. आम्ही फकीर आहोत त्यांनी आमच्या नादी लागू नये असे खुले आव्हान देखील त्‍यांनी दिले. तसेच केंद्र सरकार आपल्या चुका मान्य न करता राज्यावर टीका करते. उलटा चोर कोतवाल को डाटे अशी केंद्र सरकारची स्थिती आहे. जेवढी नुकसान भरपाई व कर्जमाफी आतापर्यंत झाली नाही तेवढी मोठ्या रकमेची व सरळ मार्गाने कर्जमाफी महाआघाडी सरकारने केली असे सांगून येत्या काही दिवसात केळी पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावून केळी उत्पादकांना सर्वार्थाने न्याय मिळवून देणार असल्याचे स्पष्ट केले. 

विकास कामांचा मांडला आढावा
मंत्री गुलाबराव पाटील यांनी वर्षभराच्या कार्यकाळात केलेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेतला. प्रामाणिकपणे चांगली कामे करत असताना विरोधक टोकाची टीका करतात त्यांच्याकडे लक्ष दिले; तर कामे थांबवावी लागतील असे सांगून येत्या चार वर्षात जळगाव जिल्ह्यातील सर्व कामांचा अनुशेष पूर्ण करण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील मराठी शाळांची मालमत्ता सुरक्षित व्हावी व शैक्षणिक स्तर सुधारावा या हेतूने जिल्ह्यातील ३५० शाळांना १४ कोटी रुपये खर्चाच्या संरक्षक भिंतीचे काम होत असल्याचे सांगून पाचोरा व भडगाव तालुक्यासाठी पंचावन्न विद्युत रोहित्र येत्या आठ दिवसात देण्याचे आश्वासित केले. 

संपादन ः राजेश सोनवणे