
जामनेर आगाराची बस मालेगावकडे निघाली असताना सुरतहून जामनेरकडे जाणाऱ्या बसशी टक्कर झाली. यात चालक, वाहक व प्रवासी यांना किरकोळ इजा झाली.
पाचोरा (जळगाव) : लोहारी (ता. पाचोरा) जवळच्या वैतागवाडीजवळ जामनेर आगाराच्या बस समोरासमोर एकमेकांवर धडकून वाहक, चालक व काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जामनेर आगाराची बस मालेगावकडे निघाली असताना सुरतहून जामनेरकडे जाणाऱ्या बसशी टक्कर झाली. यात चालक, वाहक व प्रवासी यांना किरकोळ इजा झाली. लोहारी व वैतागवाडीच्या ग्रामस्थांनी मदतकार्य करून जखमींना हलविले. रुग्णवाहिकाचालक स्वप्नील कुमावत, बबलू मराठे, मनोज पाटील, शैलेश बागूल यांनी लगबगीने घटनास्थळी येऊन जखमींना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. अमित साळुंखे यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू केले. सर्व जखमींची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, पाचोरा - जामनेर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी दोन्ही बाजूला पाच ते सात फुटापर्यंत गवत वाढले असल्याने तसेच साइड पट्टयाही मोकळ्या झाल्या असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही व अचानक वाहन समोर आल्यास रस्त्याखालीही उतरणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघात होतात. बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला वाढलेले प्रचंड गवत काढून संभाव्य अपघात व हानी टाळावी, अशी मागणी यानिमित्त पुढे आली आहे.