आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पीडित कुटुंबाला जगण्याचे बळ देतेय ‘उभारी’ योजना 

सी. एन. चौधरी  
Thursday, 29 October 2020


आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची त्यामुळे होणारी दैन्यावस्था, उपासमार प्रत्येकालाच दुःखदायी होत असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जगण्याचे बळ मिळावे, या हेतूने विभागीय आयुक्त गमे यांनी उभारी योजना सुरू केली आहे.

पाचोरा  : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पीडित कुटुंबीयांना जगण्याचे बळ मिळावे, या उदात्त हेतूने नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘उभारी’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत पाचोरा महसूल विभागातील २२ अधिकाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त ४४ शेतकरी कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारले आहे. या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

आवर्जून वाचा- महाजनांचे खडसेंवर पून्हा टिकास्त्र; मी मी पणा करणारे गेल्याने पक्षाला काही फरक पडणार नाही ! 

गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, दुष्काळ, वादळ अशा विविध कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान होणे, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नष्ट होणे, अशा घटनांचे सातत्य व त्यामुळे शेतकऱ्यांना जगणे, कर्ज फेडणे, पुढील हंगामाची तयारी करणे यासाठी आर्थिक विवंचना वाढत असल्याने आत्महत्या करण्याचा मार्ग निवडणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची त्यामुळे होणारी दैन्यावस्था, उपासमार प्रत्येकालाच दुःखदायी होत असल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना जगण्याचे बळ मिळावे, या हेतूने विभागीय आयुक्त गमे यांनी उभारी योजना सुरू केली आहे. यासाठी महसूल उपविभागनिहाय समित्या तयार करण्यात आल्या. यात १ जानेवारी २०१५ पासून ज्या शेतकऱ्यां‍नी आत्महत्या केल्या, त्यांचे सर्वेक्षण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. अशा कुटुंबीयांच्या ऑक्टोबर महिन्यात अधिकाऱ्यांनी भेटीगाठी घेतल्या. कौटुंबिक माहिती संकलित केली. त्यांना शासनाच्या कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून आर्थिक लाभ मिळवून देण्यासोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शेततळे, अन्नधान्य पुरवठा, फळबागासाठीची प्रेरणा, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान, सामाजिक संस्थांच्या मदतीने आर्थिक मदत अशा योजनांचा लाभ देऊन त्यांना जगण्यासाठी उभे करण्यात आले. पाचोरा महसूल उपविभागात समाविष्ट असलेल्या पाचोरा व भडगाव तालुक्यांतील महसूल अधिकाऱ्यांची या उभारी योजनेंतर्गत समिती तयार करण्यात आली. 
या समितीने उपविभागातील ४४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारले. या ४४ वारसांपैकी १७ जणांना घरकुल, ११ जणांना शौचालय योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. 

आवश्य वाचा- घरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर ! 
 

कुटुंबीयांच्या अडचणींची सोडवणूक 
पालकत्व स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा या कुटुंबीयांची भेट घेणे, त्यांच्या मागण्या व अडचणी विचारात घेणे, त्यांची सोडवणूक करणे, तसेच कुटुंबातील भगिनींची साडी-चोळीची ओटी भरणे असा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालकत्व स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांमध्ये राजेंद्र कचरे, कैलास चावडे, माधुरी आंधळे, गटविकास अधिकारी डॉ. अतुल पाटील, रमेश वाघ, नायब तहसीलदार विकास लाडवंजारी, संभाजी पाटील, उमाकांत कडनोर, रमेश देवकर, गजानन भालेराव, मंडळ अधिकारी शरद वाडेकर, गणेश हटकर, रमेश मोरे, संजय निकम, दिलीप पवार, महेंद्र मोतीराया, रमेश तायडे, एस. एम. पाटील, नीलेश बागड, आर. पी. शेजवळ यांचा समावेश आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora 'Ubhari' scheme gives strength to the family of a farmer who has committed suicide