घरात सुरू होता बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांची अचानक धाड आणि घरातून निघाला धुर !

निखील सुर्यवंशी
Wednesday, 28 October 2020

पोलिस त्यांना समजावण्यात गुंतलेले पाहून संशयिताने मागील खोलीतील बेसिनच्या सिंकमध्ये नोटा जाळायला सुरुवात केली. धूर पाहून पोलिसांना संशय आला.

शिरपूर : कळमसरे (ता. शिरपूर) येथे मंगळवारी दुपारी बनावट नोटा छापखान्यावर धुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक व शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बनावट चलन (नोटा) व छपाईची यंत्रे जप्त केली. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमाव धावून आला. या गोंधळाचा फायदा घेऊन संशयितांनी मोठ्या प्रमाणावर बनावट चलन जाळले. घटनास्थळावरून बापलेकासह चार जणांना अटक करण्यात आली. 

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कळमसरे येथे बनावट चलन छापले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पोलिसांच्या मदतीने दुपारी तिनला कळमसरे गावाकडून दहिवद (ता.शिरपूर) शिवारातील हायवे पोलिस चौकीपर्यंत जाणाऱ्या बायपास रस्त्यावरील आयटीआय कॉलेजसमोर असलेल्या एकमजली घरावर छापा टाकला. 

पोलिसांवर जमाव धावून आला
पोलिसांची वाहने पाहताच घरातील महिलांसह परिसरातील संशयितांचे नातलग पोलिसांना रोखण्यासाठी धावून आले. तुमच्याकडे वॉरंट आहे का, महिला कर्मचारी सोबत आणल्या का असे प्रश्न विचारून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

नोटांचा निघू लागला धुर

पोलिस त्यांना समजावण्यात गुंतलेले पाहून संशयिताने मागील खोलीतील बेसिनच्या सिंकमध्ये नोटा जाळायला सुरुवात केली. धूर पाहून पोलिसांना संशय आला. हिमतीने कर्मचारी पुढे सरसावले. त्यांनी जमाव पांगवून झडती घेण्यास सुरुवात केली. बेसिनच्या सिंकमधून राख व अर्धवट जळलेल्या नोटांचे तुकडे ताब्यात घेण्यात आले.

 छापखाना उध्वस्त 
घराच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत संगणक संच, प्रिंटर, स्कॅनर, कटर, स्केल, चिकटपट्टी, कात्री, मोबाईल आदींसह अर्धवट छापलेल्या, रंगीत छपाई करून कापून ठेवलेल्या, चुरगाळलेल्या २०० रुपये चलनमूल्य छापलेल्या नोटा व मोठ्या प्रमाणात बॉण्डपेपर ठेवले होते. एकूण ४८ हजार ३६० रुपये किमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

चौघांना अटक 
घटनास्थळावरून पोलिसांनी संशयित संतोष गुलाब बेलदार, त्याचे वडील गुलाब बाबू बेलदार, शालक मंगल पंजाब बेलदार (तिन्ही रा.कळमसरे) व विनोद तथा मनोज जाधव (रा.अजनाड बंगला, ता. शिरपूर) यांना अटक केली. त्यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर अधीक्षक डॉ. प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, संदीप मुरकुटे, हवालदार रशीद पठाण, गौतम सपकाळे, राहुल सानप, कैलास महाजन, ललित पाटील, स्वप्नील बांगर, योगेश कोळी, अमित रणमळे, प्रवीण गोसावी, बापूजी पाटील, पंकज पाटील, टी. एम.गवळी, महिला कर्मचारी नूतन सोनवणे, प्रतिभा देशमुख यांनी ही कारवाई केली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur Dhule police take action against printing of counterfeit notes four people were arrested