सतत विजेचा लंपडाव, मग काय संतापलेना गावकरी  

शंकर भामेरे
Monday, 7 September 2020

नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तोंडी तक्रारी करून देखील विजेच्या समस्या कायम आहेत. गावात सतत विजेचा लपंडाव सुरू असतो.

पहूर (ता. जामनेर) : पाळधी (ता. जामनेर) येथील वीज कार्यालयाशी संबंधित विविध समस्यांबाबत पहूर येथील उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोनवणे यांना निवेदन द्यायला आलेल्या सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांना संबंधित अधिकारी भेटले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच हार घालून येत्या आठ दिवसांच्या आत समस्यांचे निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 

याबाबत पाळधी ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पाळधी येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तोंडी तक्रारी करून देखील विजेच्या समस्या कायम आहेत. गावात सतत विजेचा लपंडाव सुरू असतो. तासन् तास वीज गायब होते. हा लपंडाव बंद करावा, धरणावरील वीजपुरवठा पूर्ववत करावा, शेती भागातील बहुतांश ट्रान्स्फॉर्मर बंद असून, ते दुरुस्त करावे, पाळधी गावासाठी दोन कायम रहिवासी करीत असलेले वायरमन नियुक्त करावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आलेल्या पाळधी येथील ग्रामस्थांनी पहूर येथील महावितरण कार्यालय कक्ष -२ च्या बंद दरवाजाला तसेच उपकार्यकारी अभियंता सोनवणे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या वेळी कमलाकर पाटील, पाळधीचे सरपंच सोपान सोनवणे, उपसरपंच संदीप सुशीर, परमेश्वर पाटील, कृष्णा पाटील, प्रल्हाद चौधरी, सुलतान तडवी, ज्ञानेश्वर वाघ, योगेश पाटील, सुमेरसिंग परदेशी, अमजत पठाण, अमित पाटील, बाबुसिंग परदेशी यांच्यासह पाळधी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pahure villagers were angry over the continuous load shedding and defeated the officers