वादळी पावसाने केला घात; शेतकऱ्यांवर ‘पांढरे सोने’ वाळवून विकण्याची वेळ !

संजय पाटील
Monday, 28 September 2020

सततच्या पावसामुळे ओला झालेला कापूस थेट विक्रीही करता येत नाही अन्‌ घरातही साठवता येत नसल्याने तो कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ आली आहे.

 
पारोळा: जिल्ह्यासह तालुक्यात सततच्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मुख्य पीक समजले जाणारे ‘पांढरे सोने’ म्हणजे कापसाला उतरती कळा लागली असून, वेचणीनंतर चक्क अंगणात वाळवावा लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. 

आवर्जून वाचा ः केळी निर्यात वाढविण्याची जबाबदारी ‘अपेडा’वर; जळगाव, कोल्‍हापूर, सोलापूरची निवड 
 

गतवर्षी अवकाळी पावसाने सर्वत्र हाहाकार करीत शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरविले होते. मात्र, यंदा याची भर निघेल या आशेने शेतकऱ्यांनी शेतात लाखो रुपये ओतले. परंतु कोरोना हाहाकार, त्यात वादळी पावसाच्या फटक्यामुळे ओला कापूस वाळवून विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उन्हामुळे कापसाचे वजन हलके होते. यामुळे बरेच शेतकरी वेचणीतील कापसाला घरात साठवण करून चांगला भाव आल्यावर विकतात. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे ओला झालेला कापूस थेट विक्रीही करता येत नाही अन्‌ घरातही साठवता येत नसल्याने तो कापूस उन्हात वाळवून विकण्याची वेळ आली आहे. आज बऱ्याच शेतकऱ्यांनी अंगणात ओला कापसाला ऊन दाखवल्याचे दिसून आले. 

तालुक्यात यंदा सर्वांत जास्त शेतात कपाशीची लागवड झाली आहे. तद्‌नंतर मका, ज्वारी व कडधान्य अशी पिके शेतकऱ्यांनी जमिनीची सुपीकता बघून पेरली आहेत. भाव चांगला मिळेल, या आशेने बरेच शेतकरी ओल्या कापसाला ऊन दाखवीत घरातच त्याची साठवण करताना दिसत आहेत. पावसाने गेल्या चार ते पाच दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतीकामाला वेग आला आहे. मजूरवर्ग पहाटेच शेतकामाला जाताना दिसत आहेत. सध्या शाळा बंद असल्याने बरेच शाळकरी मुलेही शेतात कपाशी वेचणीला जात असल्याने ऑनलाइन अभ्यासाला काही दिवस सुट्टी घेतल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे. 

वाचा ः कोणत्याही दोन राजकीय नेत्यांची भेट होणे गैर नाही 
 

कापूस वेचणीनंतर रोजगाराचा प्रश्न 
शेतात सध्या कापूस वेचणीची लगबग सुरू असून, घरातील प्रत्येक जण शेतात जात आहे. त्या कापसाची वेचणी मजुरांच्या मदतीने केली जात आहे. तालुक्यात कोरोनाचा कहर पाहता सामाजिक अंतर ठेवून शेतकरी मजूरवर्गाकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र, सततच्या वादळी व दमदार पावसामुळे कापसाची फूलफुगडी गळून पडली आहे. तालुक्यात मजूरवर्गास सावित्री फायर वर्क येथील फटाका फॅक्टरी सोडून गावात कोणताही उद्योग नसल्याने मजूरवर्गावरही मोठे संकट आहे. सध्या कापूस वेचणीमुळे त्यांना रोजगार मिळत आहे. मात्र, शेतातील कापूस वेचून झाल्यावर पुन्हा मजुरांच्या रोजगाराचा प्रश्‍न भेडसावणार आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola due to heavy rains, it was time for the farmers to dry the cotton and sell it