मसालेदार भाजीवर कोथंबीरी रुसली...पहा प्रतिकिलो काय आहे दर! 

संजय पाटील
Thursday, 20 August 2020

पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे अनेक बागायतदार भाजीपाला उत्पन्न करणारे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोनामुळे भाजीपालाचे उत्पादन करावे कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला.

पारोळा : सर्व प्रकारच्या मसालेदार भाज्या, स्वादीष्ट व नमकिन पदार्थात कोथंबीर शिवाय चव नाही. अशा भाजीपाल्यातील सर्वसमावेशक ठरलेल्या कोथंबीरचे रोज भाव वाढत असुन भाजीपाला लिलावात कोथंबीर 180 रुपये प्रतिकिलोने विकली गेल्याने मसालेदार भाजीवर कोथंबीर रुसल्याचा प्रत्यय येत आहे. अनेकजण विना कोथंबिरने काम भागवित असल्याचे गृहीनींनी माहिती दिली. 
पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे अनेक बागायतदार भाजीपाला उत्पन्न करणारे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कोरोनामुळे भाजीपालाचे उत्पादन करावे कि नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला. परिणामी जीवाची पर्वा न करता अनेकांनी कोरोनाला झुगारुन चांगले उत्पन्न काढण्याची भुमिका घेतली. दरवर्षाप्रमाणे यंदाही मालास विक्रमी भाव मिळेल; या आशेपोटी अनेकांनी शेतात कोथंबीरचे पिक घेतले. परंतु संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कोथंबीर पिक सडून गेले. परिणामी बाजारात आवक कमी झाल्याने कोथंबीरने 150 च्या पुढे आकडा गाठला. आज बाभळेनाग येथील शेतकरी सुभाष आनंदा महाजन यांनी कोथंबीर 150 ते 180 भावाने विकली. यावेळी आडती लखन महाजन यांनी आवक कमी असल्यामुळे कोथंबीरचे भाव कडाळल्याचे सांगितले. 

किरकोळ विक्रीत भाव जास्तच 
पारोळ्यातील भाजीपाला मार्केटमध्ये अमळनेर, धुळे, जळगाव येथील भाजीपाला विक्रीस येत असतो. दरम्यान कोरोना काळात ग्राहकात सामाजिक अंतर ठेवुन प्रत्येकवेळी काळजी घेवुन भाजीपाला विक्री करावी लागत असल्याचे भाजीपाला विक्रेते गोपाल महाजन यांनी सांगितले. दरम्यान लिलावात कोथंबिर 180 रूपये किलोने विकली जात असल्याने किरकोळ विक्री करणारे भाजी विक्रेते ते 200 रूपये किलोने विकत आहेत. 

कोथंबीरनंतर टोमॅंटो खातोय भाव 
सहा महिन्यांपुर्वी दहा रुपये किलोने विकला जाणारा टोमॅंटोला आज सर्वच पाले भाज्यांमध्ये चढता भाव असुन दररोज 50 ते 60 रुपये किलोने चांगल्या प्रतीचा टोमॅंटो बाजारात विकला जात आहे. 

भाजीपाल्याचे किरकोळ विक्रीचे भाव 

भाजी प्रतिकिलो दर 
कोथंबीर.. 200 रुपये 
टोमॅंटो... 50 रूपये 
मेथी......60 रूपये 
वांगे..... 40 रूपये 
कोबी.... 60 रूपये 
हिरवी मिरची...20 रूपये 

संपादन : राजेश सोनवणे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola market Kothambiri high rate two hundred kg