esakal | नदीजोड ठरले वरदान, ‘लोणी’चे पुनर्भरण 
sakal

बोलून बातमी शोधा

नदीजोड ठरले वरदान, ‘लोणी’चे पुनर्भरण 

लोणी प्रकल्प भरल्यास परिसरातील नगाव, बाहुटे, लोणीसीम, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, बाभळेनाग, सार्वे या गावांच्या विहिरींची पाणीपातळी वाढेल.

नदीजोड ठरले वरदान, ‘लोणी’चे पुनर्भरण 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी तालुक्यातील सर्वच प्रकल्पांत पाण्याचे पुनर्भरण व्हावे, यासाठी नदीजोडची संकल्पना अमलात आणली होती. पाच दिवसांच्या संततधारेमुळे गिरणा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने जामदा डाव्या कालव्यातून म्हसवे व भोकरबारी मध्यम प्रकल्पाचे पुनर्भरण केले जाते. मात्र, पाटचारीत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी वाढल्याने नगाव ‘एसकेअप’ गेटमधून १५ क्यूसेक पाणी लोणी प्रकल्पात सोडले जात असून, लोणी लघु प्रकल्पाची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. 

सध्या लोणी प्रकल्पात २० टक्के साठा असल्याची माहिती मृद्‍संधारण विभागाकडून मिळाली. या पाणलोट क्षेत्रात पाऊस व जामदा डाव्या कालव्यातून म्हसवे व भोकरबारी प्रकल्प भरले तर लोणी प्रकल्पांत पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जाईल, अशी माहिती संबंधित विभागाने दिली. 

नागीण नदीत पाणी सोडावे 
सार्वे, विटनेर, पळासखेडे गजानन, भवरखेडा आदी गावांत पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. या गावांसाठी संजीवनी ठरलेली नागीण नदी कोरडीठाक आहे. विहिरींची पातळी कमी झाली आहे. सार्वे पाटचारीतून नागीण नदीत पाणी सोडले, तर परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. यामुळे नागीण नदीतून पाणी सोडण्याची मागणी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल. याबाबत त्यांनी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्याकडे समस्या मांडली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून पाणी सोडण्याच्या सूचना केल्याची माहिती माजी मंत्री डॉ. पाटील यांनी दिली. 


...तर अनेक गावांना फायदा 
लोणी प्रकल्प भरल्यास परिसरातील नगाव, बाहुटे, लोणीसीम, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, बाभळेनाग, सार्वे या गावांच्या विहिरींची पाणीपातळी वाढेल. किंबहुना पिण्याचे पाणी व जनावरांचा पाणीप्रश्न मिटण्यास मदत होईल. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top