‘बझाडा झोन’मुळे डबडबल्या सातपुड्यातील विहिरी; काय आहे नेमके कारण वाचा सविस्तर !

प्रदीप वैद्य   
Saturday, 5 September 2020

उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार संस्थेच्या मागणीनुसार प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी नदीपात्रात जिरून परिसरातील भूगर्भातील पातळी उंचावते.

 रावेर : सुमारे सव्वा महिन्यापासून तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाची सुकी नदी खळाळून वाहत आहे. यामुळे सुकी पाणीवाटप संस्थेने नदीपात्रात खोदलेल्या अनेक विहिरींतून पाणी भूगर्भात झिरपत आहे. दोन्ही काठांवरील सुमारे २० गावांमधील साडेतीन हजार विहिरी आणि कूपनलिकांच्या भूगर्भातील पातळी किमान २५ फुटांनी उंचावली आहे. अशाप्रकारे नैसर्गिकरीत्या नदीपात्रात पाणी जिरण्याचे राज्यातील अनोखे उदाहरण आहे. 

रावेर तालुक्याच्या मध्यातून सुमारे ३२ किलोमीटर वाहणारी सुकी नदी मध्य प्रदेशातील शिव गुफा येथून उगम पावणारी सातपुड्यातील महत्त्वाची नदी आहे. नदीवर विधानसभेचे माजी अध्यक्ष (कै.) मधुकरराव चौधरी यांनी दूरदृष्टीने गारबर्डी गावाजवळ प्रकल्प बांधला. यंदा २३ जुलैला हा प्रकल्प पूर्ण भरला आणि तेव्हापासून नदीपात्रातून स्वच्छ पाणी खळाळून वाहत आहे. 

सुकी पाणीवापर संस्थेची स्थापना 
या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २००१ मध्ये सुकी पाणीवापर संस्थेची स्थापना केली. उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार संस्थेच्या मागणीनुसार प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. हे पाणी नदीपात्रात जिरून परिसरातील भूगर्भातील पातळी उंचावते, असा अनुभव आहे. 

‘बझाडा झोन’मुळे पुनर्भरण 
नदीपात्रात सातपुड्याच्या पायथ्यापासून सुमारे दहा ते १५ किलोमीटर अंतरात नदीपात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर जिरून परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे नैसर्गिकरीत्या जलपुनर्भरण होते. याबाबत शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे निवृत्त उपविभागीय अभियंता के. पी. पाटील यांनी सांगितले, की सातपुड्याच्या पायथ्यापासून पुढे नदीपात्रात दहा-पंधरा किलोमीटरपर्यंत सुमारे शंभर फूट खोल मुरूम, दगड, गोटे, वाळू यांचा थर नैसर्गिकरीत्या आहे. त्यास ‘बझाडा झोन’ म्हटले जाते. यामुळे नदीपात्रात जितके पाणी वाहते, त्याच्या अधिकाधिक पाणी भूगर्भात जिरते. अशा प्रकारची भौगोलिक रचना महाराष्ट्रात फक्त सातपुड्याच्या याच पट्ट्यात आहे, तसेच चिनावल गावाजवळील तरोळा नदीपात्रातील भागातून महिनाभर पाणी वाहिले, तर त्याचा पुनर्भरण होण्यास जास्त फायदा होतो. 

पंधरा ते वीस गावांना फायदा 
ही नदी पावसाळ्यात महिनाभर वाहिली तर दोन्ही काठांवरील दहा किलोमीटर पट्ट्यातील पंधरा ते वीस गावांना त्याचा फायदा होतो. त्यात चिनावल, वाघोदा, कुंभारखेडा, लोहारा, वडगाव, निंभोरा, उटखेडा, दसनूर, खिरोदा प्र. यावल, कोचूर, कळमोदा, गहुखेडा, रोझोदा, बलवाडी, आंदलवाडी, तांदलवाडी या नदीकाठावरील गावांशिवाय मस्कावद, सुनोदा, गाते, खिर्डी, विवरा या गावांतील भूगर्भातील पाणीपातळी वाढते. राज्य शासनाने संस्थेला या नदीपात्रात विहिरी खोदणे, त्यांची देखभाल-दुरुस्ती आदी कामांसाठी अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे. मात्र, स्थापनेपासून आतापर्यंत शासनाने अनुदान दिलेले नाही. संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ केळी उत्पादक शेतकरी डी. के. महाजन (वाघोदा) असून, उपाध्यक्ष संजीव महाजन (चिनावल) आहेत. 

साठ दशलक्ष घनमीटर पाणी जिरते 
ही नदी सामान्यपणे ऑगस्ट महिन्यात वाहायला सुरवात झाली, तर दोन महिन्यात जवळपास ६० दशलक्ष घनमीटर म्हणजे दोन टीएमसी पाणी जमिनीत जिरते. सुकी पाणीवाटप संस्थेचे दोन हजार ४६० शेतकरी सदस्य आहेत. संस्थेसाठी शासनाने प्रकल्पातील ९.८९ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. पैसे आगाऊ भरून पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. त्याचा फायदा परिसरातील तीन हजार ६३९ हेक्टर शेतीला होतो. सुमारे तीन हजार विहिरी आणि कूपनलिकांची पातळी यामुळे उंचावते. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver Bajada zone ground water level of the well in Satpuda rose to twenty five feet.