ढगाळ वातावरणामूळे केळीचे घड पिकताहेत झाडावरच; करपा रोगाचा प्रादुर्भाव 

दिलीप वैद्य
Monday, 25 January 2021

कापणीला आलेल्या एकूण झाडांपैकी ३० ते ३५ टक्के केळी झाडांवरील घड पिवळे होऊन पिकले आहेत. ही केळी कोणताही व्यापारी खरेदी करायला तयार नाही. 

रावेर : ढगाळ हवामान आणि केळीवरील करपा रोगामुळे केळीची कमी झालेली पाने यामुळे तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टरवरील केळी झाडावरच पिकण्याचे प्रकार वाढले आहेत. केळीच्या कमी भावामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांवर हे आणखी दुसरे संकट येऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 

आवश्य वाचा- लालसरी बदकाला हतनूर जलाशयाचा मानपक्षी जाहीर करावा
 

२०२० च्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात लागवड झालेल्या केळीच्या बागा आता कापणीवर आल्या आहेत. याच केळी बागांचे घड झाडावरच पिकून पिवळे होण्याचे प्रकार वाढले आहेत. कापणीला आलेल्या एकूण झाडांपैकी ३० ते ३५ टक्के केळी झाडांवरील घड पिवळे होऊन पिकले आहेत. ही केळी कोणताही व्यापारी खरेदी करायला तयार नाही किंवा या पिकलेल्या केळीचे वेफर्स देखील होत नाहीत. यामुळे वापसी केळीच्या विक्रेत्याला नाममात्र किमतीत केळी विकून टाकणे किंवा गाई-म्हशींना खायला देणे एवढा एकच पर्याय केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर उरला आहे. अशी केळी पिकण्याचे प्रमाण तालुक्यातील पूर्व, उत्तर आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर आहे. 

करपामुळे पानांची संख्या झाली कमी
याबाबत तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की केळीवरील करपा रोगामुळे केळीच्या झाडावरील पानांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे केळीचे घड पिकतात. केळीला घड येण्यापूर्वी जर शेतकऱ्यांनी करपासाठी लागणाऱ्या औषधांची फवारणी केली असती तर केळीचे घड पिकले नसते. 

आवश्य वाचा- एक असे रूग्‍णालय जेथे २१ वर्षानंतर प्रथमच झाले ‘सिझर’
 

ढगाळ हवामान आणि दमट वातावरण यामुळे केळी झाडावरच पिकून शेतकऱ्याचे ३० ते ४० टक्के नुकसान होत आहे. आज माझ्या केळी बागेतील सुमारे १०० झाडे कापली त्यातील ३० पेक्षा जास्त घड पिकले आहेत 
- किशोर गनवाणी, केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी, रावेर 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver banana crop diseases cloudy weather