साडेचार महिन्यांत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्णत्वाचे आव्हान 

दिलीप वैद्य
Tuesday, 8 December 2020

ऑगस्टअखेरपर्यंत शाळा सुरू होणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनी इयत्ता नववी- दहावीच्या अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग वगळल्याबाबतचे पत्र शाळांना पाठविले होते.

रावेर : जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गाच्या शाळा मंगळवार (ता. ८) पासून सुरू होत आहेत. शिक्षण विभागाने नववी व दहावी अभ्यासक्रमातील पंचवीस टक्के भाग वगळण्याचे पत्र सर्वच शाळांना यापूर्वी पाठवले आहे. मात्र उर्वरित जेमतेम साडेचार महिन्यांत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे. 

 

वाचा- जळगावकरांसाठी आनंदाची बातमी; स्वयंचलित यंत्रणेद्वारे होणार पाणीपुरवठा

 

कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्यापासून म्हणजे मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रभाव ओसरू लागल्यापासून काही जिल्ह्यांमध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मंगळवारपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत शाळा सुरू होणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यावर त्यांनी इयत्ता नववी- दहावीच्या अभ्यासक्रमातील २५ टक्के भाग वगळल्याबाबतचे पत्र शाळांना पाठविले होते. मात्र त्यानंतर ही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. आता नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा नियमितपणे सुरू होत आहेत. त्या यापुढेही नियमितपणे सुरू राहातील, अशी अपेक्षा आहे. मात्र जवळपास निम्म्या वेळेत म्हणजे सुमारे साडेचार महिन्यांत ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत विषय शिक्षकांना करावी लागणार आहे. 

याबाबत अधिक माहिती घेतली असता, शिक्षण विभागाने अभ्यासक्रमाचा अनावश्यक भाग यापूर्वीच वगळला आहे; यापेक्षा अधिक भाग वगळणे आता शक्य नाही, असे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. इयत्ता नववी व दहावीच्या गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम अकरावी आणि बारावीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या अभ्यासक्रमाचा संदर्भ पुढील इयत्तांमध्ये असल्याने आता अधिक अभ्यासक्रम वगळला जाऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात होणे अपेक्षित आहे. म्हणजे आता डिसेंबर महिन्याचा उर्वरित काळ आणि जानेवारी ते एप्रिल असे चार महिने अशा एकूण पाच महिन्यांत सर्व अभ्यासक्रम पूर्ण होणे अपेक्षित आहे. तो पूर्ण करताना विषय शिक्षकांची मोठीच कसरत होणार आहे. या काळात येणाऱ्या सुट्या, सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा आहे. अभ्यासक्रमात आणखी कपात व्हावी, अशी अपेक्षा शिक्षक व्यक्त करीत आहेत. 

वाचा- वरणगावात दोनशेच्या बनावट नोट

ऑनलाइन अभ्यासक्रम राज्यातील बहुतेक सर्व शिक्षकांनी सुरू केला होता. मात्र काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी मोबाईल उपलब्ध करून न दिल्याने ते यापासून वंचित राहिले आहेत म्हणून ऑनलाइन शिक्षणात जो अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे तो वर्गात पुन्हा घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे वेळ कमी आणि अभ्यासक्रम जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver challenge of completing course in four and a half months