कोरोना बाधितांना बसून आला कंटाळा...मग काय, आले एकत्र अन केला संकल्प  

दिलीप वैद्य
Thursday, 6 August 2020

आणखी काही दिवस येथे राहणार आहोत तोपर्यंत या कडूलिंबाच्या लावलेल्या रोपट्यांना पाणी देण्याचा संकल्प केला. या विधायक उपक्रमाचे प्रांताधिकारी यांनी अभिनंदन केले.

रावेर ः येथील कोविड केअर सेंटरमध्ये असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी परिसरात वृक्षारोपण करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात एक सकारात्मक संदेश दिला आहे.या परिसरात रुग्णांनी कडूनिंबाची 27 झाडे लावली आणि या परिसरात आहोत तोपर्यंत झाडांना पाणी देखील देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रावेर येथील कोविड केअर सेंटर हे उटखेडा रस्त्यावरील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नवीन वसतिगृहात आहे. हे वसतिगृह नुकतेच बांधण्यात आले आहे. या वसतिगृहाच्या आजुबाजूला असलेल्या वॉल कंपाऊंडमध्ये भरपूर मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेत शहरातील व तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांनी खड्डे खोदून वृक्ष लागवड करण्याचे ठरविले. यात मुकेश जिरेमाळी, शिक्षक नगिनदास इंगळे, अमर तायडे यांनी पुढाकार घेतला. प्रणय पाटील, कुणाल पाटील, राहूल बिजलपुरे,अमोल चौधरी, गोविंदा पाटील, रमेश विचवे यांनी खड्डे खोदून झाडे लावली.डॉ दीपक पाटील,डॉ ऋषिकेश पाटील,डॉ आश्विन महाजन, सिस्टर रोहिणी ढाके,कर्मचारी दीपक पाटील आणि अमर तायडे यांनी त्यांना सहकार्य केले.

दिवसभर बसून कंटाळा येतो, मनात नकारात्मक विचार येतात त्यापेक्षा वृक्ष लागवडीसारखे विधायक काम केल्यामुळे मनस्वी समाधान वाटत आहे. आम्ही आणखी काही दिवस येथे राहणार आहोत तोपर्यंत या कडूलिंबाच्या लावलेल्या रोपट्यांना पाणीही देण्याचा संकल्प असल्याचे नगिनदास इंगळे यांनी सांगितले. या विधायक उपक्रमाचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे आणि कोविड केअर सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ एन डी महाजन यांनी अभिनंदन केले.

 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver corona patient covid care center twenty seven tree plantation