esakal | ‘जिथे कमी तिथे आम्ही’म्हणत‘कोरोना’संगे युद्ध

बोलून बातमी शोधा

deth
‘जिथे कमी तिथे आम्ही’ म्हणत ‘कोरोना’ संगे युद्ध
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : एकीकडे कोरोनाचा कहर वाढून सर्वत्र घबराटीचे वातावरण असताना, दुसरीकडे येथील अंबिका व्यायामशाळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते ‘जिथे कमी तिथे आम्ही’ अशी भूमिका घेऊन कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यात पोचविणे, आणणे आणि प्रसंगी मृतदेहांवर हिमतीने अंत्यसंस्कार करीत आहेत. आतापर्यंत या कार्यकर्त्यांनी २६० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची दवाखान्यात ने-आण केली असून, किमान २० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

हेही वाचा: नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का ! यावर भाजप आमदार म्हणाले, 'बात दूर तक जायेगी'

सध्या सर्व गल्ली, वसाहतीत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाबाधितांना नातेवाईकही हात लावण्यास धजावत नाहीत. अशाही परिस्थितीत येथील अंबिका व्यायामशाळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे २५ कार्यकर्ते धैर्याने कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. शहर आणि परिसरातील कोरोना रुग्णांना घरून शहरासह ग्रामीण रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये तसेच बऱ्हाणपूर, सावदा, भुसावळ, जळगाव आदी ठिकाणी घेऊन जाणे, तेथून घेऊन येणे आणि प्रसंगी कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासही हे युवक मदत करीत आहेत. दिवस असो की रात्र मोबाईलवरून निरोप येताच, हे कार्यकर्ते मदतीसाठी धावून जात आहेत. अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन ऊर्फ भास्कर पैलवान यांच्या नेतृत्वाखाली ही समाजसेवा मागील वर्षापासून सातत्याने सुरू आहे.

हे आहेत समाजसेवी युवक

रवींद्र महाजन, भगवान चौधरी, बंटी महाजन, विनायक महाजन, सचिन महाजन, सचिन रामकृष्ण महाजन, योगेश प्रजापती, बाळा आमोदकर, नथू महाजन, गजानन पाटील, चैतन्य महाजन आवश्यकतेनुसार मदतीसाठी धावून जातात.

img

deth

बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सर्व कार्यकर्ते येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेड विभाग आणि तडवी कॉलनीतील कोविड केअर सेंटरला रोज दोन ते तीन वेळा जाऊन मदत करतात. ही सर्व मदत ते पक्ष, समाज, जात, धर्म बाजूला ठेवून करतात. या सर्व युवकांनी आतापर्यंत किमान २० कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यातील अनेक ठिकाणी तर मृतांचे जवळचे नातेवाईक मृतदेहास हात लावण्यास तयार नव्हते, हे विशेष. पीपीई किट न घालता केवळ मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून युवक हिमतीने रुग्ण आणि मृतदेह हाताळतात. मात्र, आतापर्यंत या युवकांना सुदैवाने कोरोनाचा कुठलाही त्रास झाला नाही. या युवकांचे शहर आणि परिसरात कौतुक होत आहे.

हेही वाचा: दीड वर्षापूर्वी हरवली..आणि प्रामाणिकपणामूळे सुखरूप मिळाली

कोरोना संकट काळात प्रशासनावरील ताण कमी करण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. सर्वसामान्य जनतेला यातून सावरण्यासाठी हिंमत देण्याचीही गरज आहे.

-भास्कर महाजन, अध्यक्ष, अंबिका व्यायामशाळा, रावेर

संपादन- भूषण श्रीखंडे