रावेर तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

तालुक्यातील विवरे, वाघोदा, चिनावल, निंभोरा, कुंभारखेडा आदी गावात आज (ता. १०) दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व जोरदार वारे वाहू लागले. काही वेळाने जोरदार वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले.

रावेर : रावेर तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याने केळी पिकासह घरांचेही नुकसान झाले. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर दोन ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली होती. 

तालुक्यातील विवरे, वाघोदा, चिनावल, निंभोरा, कुंभारखेडा आदी गावात आज (ता. १०) दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व जोरदार वारे वाहू लागले. काही वेळाने जोरदार वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले. विवरे ते वाघोदा दरम्यान अंकलेश्वर- ब-हाणपूर महामार्गावर दोन वृक्ष उन्मळून पडल्याने दिड तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे सावदा रावेर दरम्यानची दोन्ही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. चिनावल, वाघोदा, विवरे खुर्द, निंभोरा आदी गावाच्या शेतीशिवारात मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. तर केळी बागांचेही नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसारपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. संसार उघडयावर आला आहे. केळी क्षेत्र बाधीत झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याचे भरपूर नुकसान तसेच शेतातील झाडे. वीजेचे खांब व तारांचे तुटून नुकसान झाले असुन दुतर्फा रस्ता हा झाडे पडल्यामुळे बंद झाला आहे. निंभोरा (ता. रावेर) येथे ट्रॅक्टर वर झाड पडल्याने ट्रॅक्टर चे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी आदींनी पाहणी केली. 

नुकसान भरपाईची मागणी 
चिनावल (ता. रावेर) : येथील संदीप महाजन, प्रेमचंद भारंबे, प्रविण पाटील, रवींद्र भिरूड, निळकंठ नारखेडे, मिलिंद कोल्हे यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver taluka heavy rain and banana farm nuksan