शिरपूर: लुटीच्या गुन्ह्यात ब्लेडपत्ती गँग चार तासांत जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police Arrest

शिरपूर: लुटीच्या गुन्ह्यात ब्लेडपत्ती गँग चार तासांत जेरबंद

शिरपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांना ब्लेडचा धाक दाखवून लुटणार्‍या (Robbery) संशयितांच्या अवघ्या चार तासांत मुसक्या आवळण्याची कामगिरी सांगवी पोलिसांनी (Sangvi police) बजावली. एकूण सहा संशयितांच्या टोळीने (Gang) मिळून हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. संशयित कुख्यात ब्लेडपत्ती गँगचे सदस्य असल्याचे समजते.

ऊसतोड मजुरांच्या वाहतुकीचा व्यवसाय असलेले प्रदीप नाभिराज चौगुले (वय 56, रा.रूकडी ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) 14 नोव्हेंबरला चालक व अन्य दोघांना सोबत घेऊन इंडिगो कारने जामन्यापाडा (ता.शिरपूर) येथे मजुरांना घेण्यासाठी जात होते. दुपारी एकला सांगवी ते खंबाळे रस्त्यावर स्मशानाजवळ दोन दुचाकी आडव्या लावून संशयितांनी त्यांना रोखले. कारचे दरवाजे उघडून संशयितांनी खिशातील ब्लेडचे पाते काढून धाक दाखवून चौगुले यांच्याकडून 72 हजार रुपयांची रोकड व मोबाईल काढून घेतले. लुटीनंतर कारची चावीही ताब्यात घेतली. पुढे जाऊन मोबाईल व चावी शेतात फेकून देत संशयित फरारी झाले. काही वेळाने तेथून जाणार्‍या वाहनांद्वारे प्रदीप चौगुले यांनी सांगवी पोलिस ठाणे गाठले. 15 नोव्हेंबरला रात्री अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दुपारी झालेल्या लूट झाल्याने सांगवी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास प्रतिष्ठेचा करुन तातडीने कारवाईला सुरवात केली. चौगुले यांच्याकडून संशयितांचे वर्णन घेतल्यानंतर सहायक निरीक्षक शिरसाट यांनी त्यांच्या विश्वासू खबर्‍यांना कामाला लावले. सुतावरुन स्वर्ग गाठत पोलिस काही तासांतच संशयितांपर्यंत जाऊन पोहचले. संशयित विनोद गंगाराम भिल, रवींद्र देविदास भिल, भोजू राजेंद्र भिल, सागर गजमल भिल, अजय भाऊसाहेब कोळी (सर्व रा.नवे लोंढरे ता.शिरपूर) व पांडूरंग भगवान भिल (रा.नवे भामपूर ता.शिरपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लुटीचे 72 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांची गुन्ह्याची कार्यपद्धती, वापरलेले हत्यार लक्षात घेता त्यांचा कुख्यात ब्लेडपत्ती गँगशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अवघ्या चार तासांतच संशयितांना हुडकून मुद्देमाल ताब्यात घेणारे सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार, भिकाजी पाटील, हवालदार सुनिल मोरे, चतरसिंह खेसावत, योगेश मोरे, सईद शेख, संजय माळी, संजय भोई यांचे पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांनी कौतुक केले.


नेटवर्क कोणाचे

सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी मजूर नेणार्‍या ठेकेदारांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. शिरपूरच्या रस्त्यांची माहिती नसलेल्या ठेकेदारांची वाहने आडमार्गाला अडवून, प्रसंगी मारठोक करुन लूटमार होत असल्याच्या अनेक घटना घडतात. अनेकदा मनस्ताप टाळण्यासाठी ठेकेदार पोलिसांत तक्रार करीत नाहीत. या ठेकेदारांचा प्रवासमार्ग, कोणत्या दिवशी कोणत्या भागात ते जातील, त्यांच्याजवळ किती रोकड आहे याची बित्तंबातमी ठेवणारे नेटवर्क सक्रीय असून त्यामार्फत वाटमारीच्या गुन्ह्यांना चालना दिली जात असल्याचा संशय आहे.

टॅग्स :policejalgaon news