एकनाथ खडसेंच्या सत्कार कार्यक्रमांमध्ये खिसेकापूंचा विजयोत्सव !

विनोद सुरवाडे
Tuesday, 27 October 2020

संशयीत चोराने नाथाभाऊंच्या ताफ्याबरोबर मुंबई येथून मुक्ताईनगरपर्यंत होता. नाथाभाऊंचा जिथे- जिथे सत्कार करण्यात आला, त्या-त्या ठिकाणी त्याने आपला विजयोत्सव साजरा केला.

वरणगाव (ता. भुसावळ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशानंतर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे वरणगाव बसस्थानक चौकात आगमन होताच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. मात्र, या संधीचा फायदा घेत खिसेकापूने ६५ हजार रुपयांची चोरी करीत आपला विजयोत्सव साजरा केला. मात्र, या घटनेचे गांभीर्य ओळखत मुक्ताईनगर पोलिसांनी एका संशयितास गजाआड केले. 

आवश्य वाचा- शरद पवारांमुळे माझे राजकीय पुनर्वसन झाले- खडसे 
 

वरणगाव बसस्थानक परिसर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नाथाभाऊंचे स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, प्रकाश नारखेडे, माजी उपसरपंच साजिद कुरेशी, पप्पू जकातदार, राजेश चौधरी, गजानन वंजारी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, प्रशांत मोरे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते, सोहेल कुरेशी, अनिल चौधरी व भाजपतून राष्ट्रवादीत आलेले सुधाकर जावळे, प्रशांत पाटील, नितीन (बबलू) माळी, अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, दूध फेडरेशनच्या संचालिका शामल झांबरे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

गर्दीचा घेतला फायदा
सत्कार कार्यक्रम सुरू असताना कार्यकर्त्यांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मनीपर्स व खिशातील रोख रुपये लांबविली. पत्रकार सुरेश महाले यांच्या खिशामधून चोरट्यांनी १३ हजार रुपये लंपास केले. महाले यांच्या लक्षात ही बाब येतात त्यांनी वरणगाव पोलिसांत तक्रार दिली. वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी तपास चक्रे फिरविली.

संशयिताचा मुंबईपासून प्रवास 

संशयिताला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत घरफोडी, चोरी, रेल्वे पोलिसांत जबरी लूटमारीचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, संशयित हा नाथाभाऊंच्या ताफ्याबरोबर मुंबई येथून मुक्ताईनगरपर्यंत होता. नाथाभाऊंचा जिथे- जिथे सत्कार करण्यात आला, त्या-त्या ठिकाणी त्याने आपला विजयोत्सव साजरा केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. दरम्यान, संशयित एकटा नसून त्याच्या सोबत आणखी सात ते आठ संशयित असण्याची शक्यता असल्याचे देखील पोलिसांचा अंदाज आहे. 

आवर्जून वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत ! 

...यांची झाली पाकीटमारी 
सुरेश महाले (पत्रकार) १३ हजार, अशोक भोई ३० हजार, एहसान निसार शेख एक हजार ५००, चंद्रकांत चौधरी आठ हजार, पप्पू जकातदार पाच हजार ३००, समद अली कासम अली दोन हजार ६०० रुपये.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news varangaon pick pocket crime thief stole many people's wallets at eknath Khadse's felicitation function