
ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले होते. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही.
यावल : जगासह देशभरात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. मार्चपासून देशभरात लॉकडाउन प्रक्रिया सुरू होती व मागील महिन्यापासून अनलॉक प्रक्रियेस सुरवात झाली. संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट असताना यावल व चोपडा तालुक्याच्या सरहद्दीवर यावल तालुक्यातील उंटावद येथे मात्र कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही हे विशेष.
आवश्य वाचा- खडसेंच्या पक्षांतरानंतर महाजनांचे शक्तिप्रदर्शन !
लॉकडाउनच्या सुरवातीला उंटावद ग्रामपंचायतीतर्फे सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह ग्रामसेवक गुरुदास जगन्नाथ चौधरी यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून गावात मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले, तसेच गावात वेळोवेळी धुरळणी व फवारणीदेखील करण्यात आली होती. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी कोरोनाकाळात कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या व लॉकडाउनमुळे गावात परतलेल्या ३५ ते ४० रुग्णांची तपासणी करून ग्रामस्थांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.
बाहेरगावी जाणे टाळले
वेळोवेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली होती. तसेच कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी बाहेरगावी लग्नसमारंभ व अंत्यविधीच्या कार्यक्रमास जाणेही टाळले होते. गावात अंत्यसंस्काराच्या वेळी आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करत उंटावद ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे पालन केले होते. या सर्व बाबींमुळेच गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. परिसरातील गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले, मात्र उंटावद येथे सुरवातीपासून ते आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नाही.
वाचा- केंद्राचे अपयश लपविण्यासाठी आटापिटा-आमदार चौधरींचा
नियमांचे काटेकोर पालन
उंटावद हे लहानसे गाव असून, यावल तालुक्यातील शेवटचे व बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गापासून तीन किलोमीटर लांब एका कोपऱ्यात वसलेले आहे. त्यामुळे येथे नातेवाइकांव्यतिरिक्त बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी आहे. तसेच गावातील नागरिक किराणा, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेरगावी जात होते. मात्र आपसात सुरक्षित अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत असल्यामुळे गावात कोरोनाची लागण झाली नाही. मनात कोरोनाची भीती होती. मात्र शासनाच्या नियमांचे पालन करत उंटावद ग्रामस्थांनी सतर्कता बाळगली म्हणूनच गावात कोरोनाची एन्ट्री झाली नाही.
संपादन- भूषण श्रीखंडे