दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन पाठींब्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची तीव्र निदर्शने 

कैलास शिंदे
Saturday, 5 December 2020

पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्ली येथे रस्त्यावर आंदोलनास बसले आहेत. तब्बल आठ दिवस झाल्यनतंरही केंद्र शासनाने त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाही.

जळगाव  : केंद्र सरकारने नवीन मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर त्वरीत तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. 

आवश्य वाचा- अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयापासून दुपारी बारा वाजता जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील ,आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँकेच्या चेअरमन ॲड.रोहिणी खडसे, जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, तिलोत्तमा पाटील, वाल्मीक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ‘शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, केंद्रातील शासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नवीन कृषी विधेयक रद्द करावे या मागणीसाठी पंजाब आणि हरयाणातील शेतकरी दिल्ली येथे रस्त्यावर आंदोलनास बसले आहेत. तब्बल आठ दिवस झाल्यनतंरही केंद्र शासनाने त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला परंतु त्यांच्या मागण्याबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही. त्यांच्यावर अत्याचार सुरू आहे. सरकारने त्यांच्या मागण्याबाबत त्वरीत विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

संपादन - भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marthi news jalgaon intense protests by ncp party in support of dhilly farmers agitation