esakal | ‘अमृत’, ‘मलनिस्सारण’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा !

बोलून बातमी शोधा

‘अमृत’, ‘मलनिस्सारण’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा !
‘अमृत’, ‘मलनिस्सारण’ची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘अमृत’ व ‘मलनिस्सारण’ योजनांतर्गत कामांसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संबंधित मक्तेदार व पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता, उपअभियंता, तसेच प्रकल्प अधिकारी यांची सोमवारी (ता. ३) बैठक घेतली.

हेही वाचा: महामार्ग चौपदरीकरणाचे कोरोनामुळे यंत्रणा ‘लॉक’, काम ‘डाउन’ !

शहरात प्रभागनिहाय आजवर झालेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. ‘अमृत’ योजनेच्या एजन्सीचे अधिकारी, मक्तेदार, महापालिका अभियंता, उपअभियंता व प्रकल्प अधिकाऱ्यांकडून कामांसंदर्भातील आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व कामे पावसाळ्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांच्या कामांसाठी ‘डीपीडीसी’तून महापालिकेस दिलेल्या ६१ कोटी रुपये निधीतून वर्कऑर्डरप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून जळगावकरांना दिलासा देता येऊ शकेल, असे महापौर महाजन यांनी सांगितले.

याप्रसंगी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, उपमहापौर कुलभूषण पाटील, अमृत योजनेचे मक्तेदार जैन इरिगेशनचे पंकज बऱ्‍हाटे, आशिष भिरूड, भुयारी गटार योजनेचे काम करणाऱ्या मक्तेदार एल. सी. इन्फ्रा. प्रा. लि. (गुजरात)चे प्रोजेक्ट इंजिनिअर हसमुख पटेल, शाखा अभियंता अरविंद भोसले, पाणीपुरवठा अभियंता एस. एस. साळुंखे, कनिष्ठ अभियंता योगेश बोरोले, शाखा अभियंता सुनील तायडे, राजेंद्र पाटील, श्री. भांडारकर, श्री. वन्नेरे, नरेंद्र जावळे, मंजूर खान, संजय नेवे, विकास पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता जगताप, जितेंद्र रंधे, श्री. नेमाडे, प्रकाश पाटील, संजय पाटील, श्री. सोनगिरे, मनीष अमृतकर, शाखा अभियंता (प्रकल्प) लुले, कनिष्ठ अभियंता किशोर चौधरी आदी उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचा एकही अधिकारी या बैठकीस उपस्थित नसल्याने आयुक्तांसह महापौर, उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: दिलासा पण गाफिलता नको; नव्या बाधितांची संख्या आठशेच्या टप्प्यात

पाण्याचे ३५ हजार कनेक्शन

शहरातील कोल्हेनगर, चर्चच्या मागील भाग, अयोध्यानगर या भागांत अमृतची कामे जवळपास ९० टक्के पूर्णत्वास आली आहेत. तेथे पाण्याचे कनेक्शनही दिले गेले आहेत. टेस्टिंगचे कामही ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. काही कनेक्शनची कामे अपूर्ण आहेत. शहरातील उर्वरित भागांतही जलवाहिनी टाकणे, कनेक्शन देणे, भुयारी गटार योजनेची कामे ८० टक्के पूर्णत्वास आली आहेत. शहरात एकूण ६० हजारांवर पाण्याचे कनेक्शन देणे आहे. मात्र, आजवर ३५ हजार कनेक्शन दिले गेले आहे. काही नागरिकांकडे पाणीपट्टी थकीत असल्याने त्यांना कनेक्शन देणे राहिले आहे. मेहरुण, शिवाजीनगर, निमखेडी शिवार या परिसरासह काही भागात जलवाहिनी व भुयारी गटार योजनेची कामे काही अडचणींमुळे थांबली आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

संपादन- भूषण श्रीखंडे