
Jalgaon News : अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपीला कारावास
जळगाव : कोरोना लॉकडाउनमध्ये मुंबई ते अकोला पायी प्रवास करणाऱ्या अल्पवयीन बालिकेला दुचाकीवर पळवून नेले होते.
याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत बाललैंगिक अत्याचार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. (Minor girl kidnapping accused jailed Jalgaon News)
या गुन्ह्याचे दोषारोप सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायालयाने मंगळवारी (ता. १४) आरोपी गणेश बांगर याला कारावासाची शिक्षा सुनावली.कोरेाना महामारीत देशभर लॉकडाउन लावले होते. देशातील सार्वजनिक, खासगी बस, रेल्वे बंद झाल्याने लाखो लोकांनी हजारो मैलचा प्रवास पायी केला.
१९ मे २०२० ला मुंबई येथून १६ वर्षीय मुलगी, तिचा भाऊ आणि कुटुंब चालत निघाले होते. जळगाव शहरातून जात असताना, कालिंकामाता मंदिराजवळ जेवणाला थांबले.
तेथे संशयित गणेश सखाराम बांगर (वय ३२, रा. मालेगाव-वाशिम) दुचाकी घेऊन आला आणि पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाला, ‘मीही अकोला येथे जात आहे. मोठी गाडी बिघडली असून, त्यात तुम्हाला घेऊन गेलो असतो’. पीडिता व तिचा भावाला दुचाकीवर बसवून घेऊन गेला.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
त्या भामट्याने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ तिच्या भावाला, तू पायी चालत ये, पुढे पोलिस असल्याचे सांगत वाहनावरून खाली उतरवून पळ काढला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. काही दिवसांनी गणेश बांगर याला जळगाव पोलिसांनी अटक केली.
पीडितेसह नऊ महत्त्वपूर्ण साक्ष
जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश डी. वाय. काळे यांच्यासमोर सरकारी अभियोक्ता ॲड. प्रदीप महाजन यांनी पीडिता, तिचा भाऊ यांच्यासह तपासाधिकारी, असे एकूण नऊ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. गणेश बांगर याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने अपहरणाच्या ३६३ कलमाखाली दोन वर्षे १० महिने कारावास, ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कैद, कलम ३२३ अन्वये तीन महिने कारवासाची शिक्षा ठोठावली.