
Jalgaon News : पिंप्राळ्यात उभे राहतेय ‘मॉडेल’ अग्निशमन केंद्र; 1 कोटी शासनाचा निधी
जळगाव : अग्निशमन कार्यालयाजवळच कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधा, त्याच ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणारे मुंबई, पुण्याप्रमाणे ‘मॉडेल’ अग्निशमन केंद्र (Fire Station) जळगावातील पिंप्राळा येथे लवकरच उभे राहणार आहे.
यामुळे पिंप्राळ्यासह परिसरात एक चांगली सुविधा होणार आहे. (model fire station will soon be set up at Pimprala fund of 1 crore approved by government jalgaon news)
शहरात रहिवासी वस्ती वाढत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची गरजही आहे. पिंप्राळा परिसराचा भाग मोठ्या संख्येने वाढत आहे. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी अग्निशमन सुविधा उपलब्ध होण्याचीही गरज आहे.
हीच गरज लक्षात घेऊन पिंप्राळा येथील खुली जागा गट क्रमांक सातमध्ये अग्निशमन केंद्र उभारण्यात येत आहे. जिल्हा नियोजन मंडळातून तब्बल एक कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. या ठिकाणी अग्निशमन केंद्र उभारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. लवकरच त्याचे कामही सुरू होणार आहे. या ठिकाणी तब्बल २० हजार स्केअर फूट जागा आहे.
या ठिकाणी अग्निशमन दलाच्या दोन मोठ्या गाड्या, तसेच दोन मिनी फायरफायटर, एक रुग्णवाहिका उभी राहुल शकेल असे केंद्र उभारण्यात येत आहे. अग्निशमन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सुविधाही याच ठिकाणी राहणार आहे. तसेच याच ठिकाणी अग्निशमन वाहनात पाणी भरण्याची सुविधाही असणार आहे.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
मनपाकडे प्रस्ताव
पिंप्राळा व परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी उभे राहणारे हे अग्निशमन केंद्र एक जिल्ह्यातील ‘मॉडेल’ठरणार आहे. यासाठी एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. त्यातील एक कोटी रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे.
२८ लाखांचा निधी काही विस्तारित कामासाठी लागणार आहे. महापालिकेच्या बुधवारी (ता.१५) होणाऱ्या महासभेत यासाठी मंजुरीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढून हे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
"पिंप्राळा परिसर, तसेच तीन प्रभागातील दीड लाख लोकसंख्येसाठी एकही अग्निशमन केंद्र नाही. त्याची गरज लक्षात घेऊन लोकांच्या सुविधेसाठी हे केंद्र मंजूर करून घेण्यात आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून हे केंद्र उभे राहात आहे."- कुलभूषण पाटील, उपमहापौर, जळगाव महापालिका