जळगावातील वादग्रस्त अतिक्रमण मनपाने पहाटे काढले; आणि गणेश कॅालनी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

भूषण श्रीखंडे
Thursday, 21 January 2021

गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस हा मार्ग आता मोकळा झाला आहे.

जळगाव :  शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण त्या समाजातील बऱ्याचशा लोकांना विश्वासात घेत महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

आवश्य वाचा- कसं होणार जळगावच ! उड्डाणपुल अर्धा बांधला गेला, तरी पूल ‘वाय’किंवा ‘टी’आकाराचा हवा हे ठरेणा   
 

गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही याबाबत त्या समाजाच्या लोकांना विश्वासात घेऊन गुरुवारी सकाळी महापौर भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते वादग्रस्त अतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी ५.३० वाजताच महापौर सौ.भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले. 

विधीवत दुवा पठण करून काढले अतिक्रमण
सकाळी ६ वाजता मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी दुवा पठण केली त्यानंतर तेथील चादर आणि इतर साहित्य एका बाजूला ठेवण्यात आले. मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: municipal corporation marathi news jalgaon road encroachment removed department encroachment elimination morning